चंदीगड (पंजाब): पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेमध्ये झालेल्या निष्काळजीपणाबाबत काही वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई होत आहे. न्यायमूर्ती इंदू मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय समितीच्या अहवालानंतर पंजाब सरकारने पाच पोलिस अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई केली आहे. पंजाबचे माजी डीजीपी सिद्धार्थ चट्टोपाध्यायही या कारवाईच्या कक्षेत आले आहेत. तत्कालीन डीजीपी सिद्धार्थ चटोपाध्याय यांच्याशिवाय डीआयजी इंदरबीर सिंग, फिरोजपूरचे एसएसपी हरमनदीप आणि अन्य दोघांवर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
कारवाईचे आदेश जारी:यासोबतच तत्कालीन एडीजीपी (कायदा व सुव्यवस्था) नरेश अरोरा, आयपीएस अधिकारी नागेश्वर राव, जे त्यावेळी एडीजीपी सायबर क्राईम होते, यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तत्कालीन एडीजीपी पटियाला रेंज मुखविंदर सिंग चेना, तत्कालीन आयजी काउंटर इंटेलिजन्स राजेश अग्रवाल, तत्कालीन डीआयजी फरीदकोट सुरजित सिंग, तत्कालीन मोगाचे एसएसपी चरणजीत सिंग, यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.
तत्कालीन मुख्य सचिवांना दिलासा : तत्कालीन मुख्य सचिव अनिरुद्ध तिवारी यांनाही या घटनेसाठी जबाबदार धरण्यात आले होते. मात्र सरकारने दिलेल्या कारवाईच्या सूचनांमध्ये अनिरुद्ध तिवारी यांच्या नावाचा समावेश नाही. त्यांना सरकारने एकप्रकारे दिलासाच दिला आहे. केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी नुकताच पंजाबच्या मुख्य सचिवांकडून अहवाल मागवला होता. पंतप्रधानांच्या सुरक्षेतील कुचराईचे प्रकरण चांगलेच तापले होते आणि त्यावर कारवाईची मागणी केंद्राकडून सातत्याने होत होती. पंजाबमध्ये सत्तापरिवर्तन होऊन 1 वर्षानंतर याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. केंद्रानेही कारवाईच्या दिरंगाईबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण:2022 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी 5 जानेवारी 2022 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी फिरोजपूर येथील रॅलीत सहभागी होण्यासाठी पंजाबमध्ये आले होते. तेथे काही घटकांनी पंतप्रधान मोदींचा ताफा अडवला. येथे पंतप्रधानांच्या सुरक्षेतील निष्काळजीपणाचे प्रकरण समोर आले आणि पंतप्रधानांना रॅली न करताच दिल्लीला परतावे लागले. त्यावेळी पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी होते. या प्रकरणावरून चन्नी आणि पीएम मोदी यांच्यात वादही झाला होता. हा मुद्दा मोठा राजकीय मुद्दा बनला, एवढेच नाही तर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयातही पोहोचले होते.
हेही वाचा: केदारनाथला जाणाऱ्या भाविकांसाठी महत्त्वाची बातमी, रस्ते बंद