महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

हिल्स स्टेशनवर होणारी गर्दी तिसऱ्या लाटेला आमंत्रण देणारी; पंतप्रधानांचा महाराष्ट्रातील जनतेला अप्रत्यक्ष इशारा - पंतप्रधान नरेंद्र मोदी कोरोना तिसरी लाट

कोरोनामुळे पर्यटन, व्यापाराला मोठा फटका बसला आहे. मात्र, आज मी पुन्हा एकदा आवर्जून सांगतो की, हिल्स स्टेशनवर, मार्केट्समध्ये विनामास्क, नियमांचं उल्लंघन करत गर्दी करणे ही चिंतेची बाब आहे. अनेकांची ही भावना आहे की, तिसरी लाट येण्यापूर्वी आम्हाला मज्जा करायची आहे. मात्र, त्या लोकांना समजावणे गरजेचे आहे, की तिसरी लाट आपोआप येणार नाही.

pm narendra modi
पंतप्रधान नरेंद्र मोदी

By

Published : Jul 14, 2021, 9:14 AM IST

Updated : Jul 14, 2021, 9:27 AM IST

मुंबई - कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेचा महाराष्ट्रासह देशाला मोठा फटका बसला. अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. काही ठिकाणी तर परिवारातीलच अनेकांना आपला जीव गमवावा लागला. जून महिन्यात ही लाट ओसरताना दिसत असल्यावर राज्य सरकारसह केंद्रानेही निर्बंध हटवण्याचा निर्णय घेतला. मात्र, निर्बंध हटवल्यावर जनता आणखीनच बेजबाबदार पणे वागतंय, असे निदर्शनास आले असतानाच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील जनतेला इशारा दिला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल (मंगळवारी) उत्तर-पूर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी ऑनलाइनच्या माध्यमातून कोरोनाच्या परिस्थिती संदर्भात संवाद साधला. यावेळी त्यांनी हिल्स स्टेशनवर होणारी गर्दी आणि लोकांचं बेजाबदारपणे वागणं याबाबत आपली नाराजी दर्शवली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले?

''कोरोनामुळे पर्यटन, व्यापाराला मोठा फटका बसला आहे. मात्र, आज मी पुन्हा एकदा आवर्जून सांगतो की, हिल्स स्टेशनवर, मार्केट्समध्ये विनामास्क, नियमांचं उल्लंघन करत गर्दी करणे ही चिंतेची बाब आहे. अनेकांची ही भावना आहे की, तिसरी लाट येण्यापूर्वी आम्हाला मज्जा करायची आहे. मात्र, त्या लोकांना समजावणे गरजेचे आहे, की तिसरी लाट आपोआप येणार नाही. अनेकदा लोक प्रश्न विचारतात की, तिसऱ्या लाटेची काय तयारी केली आहे? मात्र, तिसऱ्या लाटेला आपण कशाप्रकारे थांबवू शकतो? आपण नियमांचे अत्यंत काटेकोरपणे कशाप्रकारे पालन करु शकतो? याबाबत प्रश्न विचारायला हवा. जर नियमांचे पालन केले तर आपण कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला थांबवू शकतो. कोरोनाची तिसरी लाट येईल ही वेगळी बाब आहे. मात्र, येऊ नये यासाठी नागरिकांनी जागृत राहून कोरोनाच्या नियमांचं पालन करावे. त्यासाठी कोणतीही तडजोड करू नये. तज्ञदेखील चेतावनी देत आहेत की, बेजाबबदारपणा कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होऊ शकते. यामुळे आपण जबाबदारीने वागलं पाहिजे. त्यासाठी ज्यामुळे गर्दी होईल, असे कार्यक्रम टाळता येत असतील तर ते टाळायला पाहिजे''.

महाराष्ट्रातील परिस्थिती वेगळी नाही -

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या संबोधनादरम्यान, हिल्स स्टेशन, पर्यटन स्थळांवर होणारी गर्दी पाहता चिंता व्यक्त केली. तर दुसरीकडे राज्यात मान्सूनचे आगमन आणि लॉकडाऊनची शिथिलता ही वेळ जुळून आल्याने राज्यातील निर्सगप्रेमी पर्यटकांना पर्यटनस्थळे आकर्षित करू लागली आहेत. त्यामुळे पर्यटनस्थळांवर पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. तर राज्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत पुन्हा वाढ होत असल्याचे चित्र आहे. अशा परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्तर-पूर्व राज्यातील लोकांना दिलेला इशारा हा अप्रत्यक्षपणे महाराष्ट्रातील जनतेलाच दिला असल्याचे दिसून येत आहे.

पालघर जिल्ह्यातील वाडा-खडकोना या गावातील आशेरी गडावर पर्यटकांनी मोठी गर्दी केल्याचे पहायला मिळत आहे. लोणावळ्यात पावसाने चांगलाच जोर धरल्यामुळे जून महिन्याच्या अखेरीस मुंबई आणि पुणेकर पर्यटकांनी हजेरी लावून कुटुंबासह मनमुराद आनंद लुटला. तसेच मोठ्या प्रमाणात गर्दी केली.

अनेक ठिकाणी लग्न समारंभात कोरोना नियमांचं उल्लंघन करत गर्दी केली जात आहे. प्रशासनाकडून कारवाई करत दंड वसूल केला जात आहे. मात्र, तरीदेखील जनतेकडून प्रशासनाच्या हाकेला दाद दिली जात नसल्याचे चित्र आहे. अमरावती जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर घटली आहे. त्यामुळे अमरावती जिल्हाही अनलॉक झाला. त्यामुळे विदर्भाचे पर्यटनस्थळ असलेल्या चिखलदऱ्यामध्ये पर्यटकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी करायला सुरुवात केली आहे. पावसाळ्यात चिखलदऱ्यामधील सर्वच पिकनिक पॉईंट पर्यटकांना आकर्षित करतात. त्यामुळे अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा येथे होणारी गर्दी आणि कोरोना नियमांचे पालन झाल्यास ही पर्यटनस्थळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा प्रसार करण्यासाठी पुरक ठरणारी असल्याचे जाणकारांचे मत आहे.

लोणावळा

महाराष्ट्रातील कोरोना रुग्णसंख्या वाढतेय -

जुलै महिन्याच्या पहिल्या दहा दिवसांमध्ये दररोज आठ ते दहा हजारांच्या दरम्यान नव्याने कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. मागील 12 दिवसांत रुग्णांची वाढ झाली आहे. तर मृत्युदरातही किंचित वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे दुसरी लाट कमी झाली असली तरी पूर्णपणे ओसरली नसल्याचेच या आकडेवारीवरून दिसून येत आहे. तसेच राज्यातील आठ जिल्ह्यांमध्ये अजुनही पॉझिटिव्हिटी रेट पाच टक्क्यांच्या वर असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

महाराष्ट्रातील कोरोना रुग्णसंख्या वाढतेय

भूशी धरणावर पोलीस बंदोबस्त -

भुशी धरण ओव्हर फ्लो झाले असे म्हटले की हजारो पर्यटक लोणावळ्याच्या दिशेने येतात. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या पुणे जिल्ह्यात पर्यटनबंदी आहे. त्यामुळं काही पर्यटक हे बंदी धुडकावून भुशी धरणावर पोहोचत आहेत. दरम्यान, यावर्षी धरण काही दिवस अगोदर ओव्हर फ्लो झाल्याचे पाहायला मिळाले आहे. या ठिकाणीही मोठ्या प्रमाणात गर्दी होते.

भूशी धरण

याचबरोबर सह्याद्री पर्वतारांगेतील घाट माथा, गडकिल्ले याठिकाणी पावसाळ्यातील वातावरण आल्हाददायक असते. त्यामुळे याठिकाणी पर्यटकांची गर्दी हमखास वाढते. त्याचबरोबर कोल्हापूरमधील आंबोली घाट, फोंडा घाट, नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी, पुणे जिल्ह्यातील लोणावळा, माळशेज, जुन्नर या ठिकाणी पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. मात्र, पर्यटकांकडून कोरोना नियमांचे पालन योग्य प्रमाणात केले जात नाही. परिणामी कोरोनाची संभाव्य तिसरी लाट आणि नवा व्हेरियंट डेल्टा प्लसच्या धोका वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. सद्यस्थितीत राज्यातील ही पर्यटनस्थळे डेल्टा प्लसचा प्रादुर्भाव वाढवणारी हॉटस्पॉट केंद्र ठरू शकतात, अशी शक्यता नाकारता येत नाही.

Last Updated : Jul 14, 2021, 9:27 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details