नवी दिल्ली :पंतप्रधान नरेंद्र मोदी आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पोर्ट ब्लेअरमधील वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीचे उद्घाटन करणार आहेत. दळणवळणाच्या पायाभूत सुविधा वाढवणे हे सरकारचे प्रमुख लक्ष आहे. 710 कोटी रुपये खर्चून बांधलेल्या नवीन एकात्मिक टर्मिनल इमारत कार्यान्वित झाल्यामुळे पोर्ट ब्लेअरमधील संपर्क वाढणार असल्याचे पंतप्रधान कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार उद्घाटन :पोर्ट ब्लेअरमधील वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरील नवीन एकात्मिक टर्मिनल इमारतीमुळे अंदमान आणि निकोबार बेटांवर सहज प्रवास करता येईल. त्यामुळे पर्यटनाला चालना मिळेल, असेही या निवदनात नमूद करण्यात आले आहे. अंदमान आणि निकोबार बेटांमधील पोर्ट ब्लेअर येथील वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरील नवीन एकात्मिक टर्मिनल इमारतीचे उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सकाळी 10:30 वाजता पार पडणार आहे.
विमानतळावर आता एकावेळी 10 विमाने होऊ शकतात पार्क :पोर्ट ब्लेअर येथील वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळ हे समुद्र आणि बेट यांच्याशी साधर्म सांगणाऱ्या शंखाच्या आकाराचे बांधण्यात आले आहे. या विमानतळावर 40 हजार 800 चौरस मीटरचे एकूण बिल्ट अप क्षेत्र आहे. नवीन टर्मिनल इमारत दरवर्षी 5 दशलक्ष प्रवाशांना सेवा देण्यास सक्षम असणार आहे. पोर्ट ब्लेअर विमानतळावर 80 कोटी रुपये खर्चून दोन बोईंग 767 ते 400 आणि दोन एअरबस 321 प्रकारच्या विमानांसाठी सुयोग्य ऍप्रन देखील बांधण्यात आले आहेत. त्यामुळे विमानतळ आता एकावेळी 10 विमाने पार्क करू शकेल.
नवीन इमारतीमध्ये डबल इन्सुलेटेड रूफिंग सिस्टीम :नवीन विमानतळाच्या इमारतीमध्ये उष्णता कमी करण्यासाठी खास योजना आखण्यात आली आहे. इमारतीच्या आत कृत्रिम प्रकाशाचा वापर कमी करुन दिवसा नैसर्गिक सूर्यप्रकाश वाढवण्यासाठी 'डबल इन्सुलेटेड रूफिंग सिस्टीम' बसवण्यात आल्याचे पंतप्रधान कार्यालयाने स्पष्ट केले आहे.
टर्मिनल इमारतीमध्ये 500 किलोवॅट सौर ऊर्जा प्रकल्प :या नवीन इमारतीमध्ये भूमिगत पाण्याच्या टाकीमध्ये पावसाचे पाणी साठवण्याची क्षमता आहे. लँडस्केपिंगसाठी 100 टक्के प्रक्रिया केलेले सांडपाणी पुनर्वापर आणि साइटवरील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प बांधण्यात आले आहेत. या टर्मिनल इमारतीमध्ये 500 किलोवॅट सौर ऊर्जा प्रकल्पाची उभारणी करण्यात आली आहे. अंदमान आणि निकोबारच्या मूळ बेटांचे प्रवेशद्वार म्हणून पोर्ट ब्लेअर हे पर्यटकांसाठी अतिशय लोकप्रिय ठिकाण असल्याचे पंतप्रधान कार्यालयाने स्पष्ट केले आहे.