नवी दिल्ली- देशभरातील वाढत्या कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहेत. यावेळी ते कोरोना महामारी सध्यस्थितीची माहिती घेणार असून लसीकरण मोहिमेचाही आढावा घेण्याची शक्यता आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार पंतप्रधान आज सायंकाळी साडेसहा वाजता मुख्यमंत्र्यांशी संवाद साधतील. कोरोना संक्रमण रोखण्यासाठी ते काही ठोस निर्णय घेण्याचीही शक्यता आहे.
पंतप्रधान मोदी यांना याआधी १७ मार्च रोजी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला होता. त्यावेळी ते म्हणाले होते, की महामारीवर आताच नियंत्रण नाही मिळवले तर देशभरात संक्रमण वाढण्याची शक्यता आहे.
याच आठवड्यात केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी ११ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्यमंत्र्यांसोबत बैठक केली होती. यात महाराष्ट्र, छत्तीसगड, दिल्ली, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, झारखंड, कर्नाटक, मध्यप्रदेश, पंजाब आणि राजस्थान यांचा समावेश होता.
आरोग्य मंत्रालयाचे म्हणणे आहे की, महाराष्ट्र, छत्तीसगड, कर्नाटक, उत्तर प्रदेश, दिल्ली, तामिळनाडू, मध्यप्रदेश आणि पंजाबात कोविड-१९ च्या केसेस वेगाने वाढत आहेत. एका दिवसात एक लाखांपेक्षा जास्त रुग्ण सापडण्यामध्ये यांचा वाटा ८१.९० टक्के आहे.