वाराणसी (उत्तरप्रदेश): पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी वाराणसीला पोहोचले. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी त्यांचे स्वागत केले. पंतप्रधानांनी सुमारे 1780 कोटी रुपयांचे 28 प्रकल्प वाराणसीला भेट दिले. रुद्राक्ष कन्व्हेन्शन सेंटर येथे पंतप्रधानांनी वन वर्ल्ड टीबी समिटला संबोधित केले. ते म्हणाले की, काशी नगरी हा तो चिरंतन प्रवाह आहे जो हजारो वर्षांपासून मानवतेच्या प्रयत्नांची आणि परिश्रमाची साक्षीदार आहे. कितीही मोठं आव्हान असलं तरी प्रत्येकाच्या प्रयत्नातून एक नवा मार्गही समोर येतो, याची काशी साक्षीदार आहे. मला खात्री आहे की, काशी टीबीसारख्या आजाराविरुद्धच्या आपल्या जागतिक संकल्पाला नवी ऊर्जा देईल.
वन वर्ल्ड टीबी समिट तीन दिवस चालेल:वाराणसीमध्ये क्षयरोग निर्मूलनासाठी पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित केली जात आहे. ही टीबी परिषद तीन दिवस चालेल. यामध्ये देशासह परदेशातील तज्ज्ञही विचारमंथन करणार आहेत. या परिषदेत भारतासह 10 देशांचे आरोग्य मंत्री आणि इतर राज्यांचे आरोग्य मंत्री, डॉक्टर आणि कर्मचारी सहभागी होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी या टीबी परिषदेच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत.