नवी दिल्ली Narendra Modi :भारतीय जनता पार्टीनं राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये कॉंग्रेसला धोबीपछाड देत दणदणीत विजय मिळवला आहे. यापैकी मध्य प्रदेशात भाजपाची सत्ता होती, तर राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये कॉंग्रेस पक्ष सत्तेत होता.
जनतेला सलाम : पक्षाच्या या ऐतिहासिक कामगिरीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत आनंद व्यक्त केला. "मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडच्या निवडणूक निकालांवरून भारतातील जनतेचा विश्वास केवळ सुशासन आणि विकासाच्या राजकारणावर असल्याचं दिसून येत आहे", असं ते म्हणाले. "जनतेला सलाम! या सर्व राज्यातील लोक, विशेषत: माता, बहिणी, मुली आणि आमच्या तरुण मतदारांनी भाजपाला प्रेम, विश्वास आणि आशीर्वाद दिल्याबद्दल मी मनापासून आभार मानतो", असं ते म्हणाले.
कार्यकर्त्यांचे आभार : पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, "मी या राज्यातील लोकांना खात्री देतो की आम्ही तुमच्या कल्याणासाठी अथक प्रयत्न करत राहू. विजयाबद्दल पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांचे विशेष आभार. तुम्ही सर्वांनी भाजपाची विकासाची कल्याणकारी धोरणं ज्या पद्धतीनं लोकांमध्ये नेली ती कौतुकास पात्र आहेत. विकसित भारताचं ध्येय घेऊन आम्ही पुढे जात आहोत. आम्हाला थांबायचं नाही आणि खचून जायचं नाही. आपल्याला भारताला विजयी करायचं आहे. आज आम्ही एकत्रितपणे या दिशेनं एक मजबूत पाऊल उचललं आहे", असं त्यांनी नमूद केलं.
तेलंगणात पाठिंबा वाढतोय : भाजपाला तीन राज्यात विजय मिळाला असला तरी तेलंगणात मात्र पक्ष फारशी चमकदार कामगिरी करू शकला नाही. येथे कॉंग्रेसनं सत्ताधारी भारत राष्ट्र समितीचा पराभव केला. यावरही पंतप्रधान मोदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी तेलंगाणातील मतदारांचे आभार मानलं. "तेलंगणामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये आम्हाला पाठिंबा वाढत चालला आहे. पुढील काळातही हा ट्रेंड कायम राहील. तेलंगणासोबतचं आमचे नातं अतूट आहे. आम्ही लोकांसाठी काम करत राहू. भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मेहनतीचं मी कौतुक करतो", असं मोदी म्हणाले.
हेही वाचा :
- ABVP सदस्य ते तेलंगणात कॉंग्रेसच्या मुख्यमंत्री पदाचे दावेदार! असा आहे रेवंत रेड्डी यांचा प्रवास
- साडेसहाव्या वर्षी घर सोडलं, आता राजस्थानमध्ये भाजपासाठी गेमचेंजर! जाणून घ्या कोण आहेत बाबा बालकनाथ
- "देशात भारत-जोडो, परदेशात जाऊन भारत-तोडो, जनतेनं चांगलाच धडा शिकवला", मुख्यमंत्र्यांनी राहुल गांधींची खेचली