नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी फ्रान्स भेटीचे निमंत्रण दिले होते. त्यांच्या निमंत्रणावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन दिवशीय फ्रान्स आणि यूएईच्या दौऱ्यावर गेले आहेत. पंतप्रधान मोदी हे भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजेच्या दरम्यान फ्रान्समध्ये पोहचले आहेत. तिथे विमानतळावर गार्ड ऑफ ऑनर देऊन मोदींचे स्वागत करण्यात आले आहे. यावेळी अनेक भारतीय मोदींना बघण्यासाठी विमानतळावर आले होते.
दोन दिवसीय दौरा -पंतप्रधान नरेंद्र मोदी 13 ते 15 जुलै 2023 दरम्यान फ्रान्स आणि संयुक्त अरब अमिरातीला (UAE) भेट देणार आहेत. 14 जुलैला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बॅस्टिल डे परेडमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. बॅस्टिल डे परेडमध्ये तिन्ही सेवांमधील भारतीय सशस्त्र दलांची तुकडी देखील सहभागी होईल. फ्रान्सचा दौरा संपवून पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 जुलैला अबुधाबीला जाणार असून दोन दिवस परतत आहेत. दरम्यान, दौऱ्याला निघण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माध्यमांशी संवाद साधला. भारत आणि फ्रान्स हे दोन्ही देश संरक्षण, व्यापर, शिक्षण, संस्कृती आदी क्षेत्रात सहकार्य करत असल्याचे स्पष्ट केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी घेणार अनिवासी भारतीयांची भेट :पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या दोन दिवशीय फ्रान्सच्या दौऱ्यात राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्याशी विविध विषयावर चर्चा करणार आहेत. त्यासह राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन पंतप्रधानांच्या सन्मानार्थ राज्य मेजवानीचे तसेच खाजगी डिनरचेही आयोजन करणार आहेत. या भेटीत पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्सचे पंतप्रधान तसेच फ्रेंच सिनेटसह नॅशनल असेंब्लीच्या अध्यक्षांची भेट घेणार आहेत. फ्रान्समधील अनिवासी भारतीय प्रवासी, भारतीय आणि फ्रेंच कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह प्रमुख फ्रेंच व्यक्तींशी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संवाद साधणार आहेत.
भारत फ्रान्स धोरणात्मक भागीदारीचे 25 वर्ष :या वर्षी भारत फ्रान्स धोरणात्मक भागीदारीचा 25 वा वर्धापन दिन आहे. त्यामुळे पंतप्रधानांच्या फ्रांसच्या भेटीमुळे धोरणात्मक, सांस्कृतिक, वैज्ञानिक, शैक्षणिक आणि आर्थिक सहकार्यासारख्या विविध क्षेत्रांमध्ये भागीदारीच्या भविष्यासाठी रोडमॅप तयार करण्याची संधी मिळणार आहे. त्यानंतर 15 जुलैला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अबुधाबीला भेट देणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संयुक्त अरब अमिरातीचे राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांच्याशी चर्चा करणार आहेत.
२६ राफेल विमानांच्या खरेदीसाठी आवश्यक तयारी :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दोन दिवसांचा फ्रान्स दौरा अतिशय महत्त्वाचा असल्याची माहिती बुधवारी परराष्ट्र सचिव विनय क्वात्रा यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यात संरक्षण संबंध वाढवण्यावर भर देण्यात येणार आहे. भारताकडून राफेलच्या नौदल मॉडेलच्या 26 विमानांच्या खरेदीसाठी आवश्यक तयारी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विमान इंजिनच्या संयुक्त विकासाशी संबंधित करारावरही चर्चा होऊ शकते. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखालील संरक्षण संपादन परिषद (DAC) पंतप्रधान मोदींच्या पॅरिस भेटीदरम्यान जाहीर होणारे प्रमुख संरक्षण करार मंजूर करेल अशी अपेक्षा असल्याचेही विनय क्वात्रा यांनी स्पष्ट केले.