अयोध्या(उत्तर प्रदेश) -अयोध्येत भव्य दिव्य राम मंदिर बांधणे हे लाखो राम भक्तांचे स्वप्न होते जे पंतप्रधानांनी साकार केले आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर मी प्रथमच अयोध्येत आलो आहे. प्रभू रामाच्या आशीर्वादाने आम्हाला धनुष्यबाण आणि पक्षाचे नाव मिळाले आहे. राम मंदिर हा आमच्यासाठी राजकीय विषय नसून आमची श्रद्धा आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अयोध्येत रामलल्लाचे दर्शन घेतले. यावेळी भाजप, शिवसेनेचे अनेक मंत्री, आमदार, खासदार, कार्यकर्ते उपस्थित होते.
रामलल्लाचे घेतले दर्शन - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच शिवसेना भाजपच्या मंत्र्यांनी आज रामलल्लाचे दर्शन घेतले. यावेळी दोन्ही पक्षांचे खासदार, आमदार व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी राम मंदिराच महाआरती करण्यात आली. सुरुवातीला हनुमान गढीचे दर्शन घेतले व नंतर या सर्वांनी राम मंदिरात जाऊन रामलल्लाचे दर्शन घेतले. यानंतर मुख्यमंत्र्यांनी लक्ष्मण किल्ला येथेही भेट दिली.
हिंदुत्वावरून विरोधकांवर टीका -विरोधक आणि उद्धव ठाकरेंवर निशाणा साधत एकनाथ शिंदे म्हणाले की, अयोध्या यात्रेबाबत तुम्ही जे दृश्य पाहत आहात, ती शिवसेना आणि भाजपसाठी आनंदाची बाब आहे, पण काही लोकांना यामुळे वेदना होत आहेत. अयोध्येतील आम्हाला मिळालेल्या प्रतिसादामुळे विरोधकांच्या पोटातही दुखत आहे. पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, अनेकांना हिंदुत्वाची जाणीवपूर्वक ऍलर्जी आहे. स्वातंत्र्यानंतरही अनेकजण जाणीवपूर्वक हिंदुत्वाचा अपमान करत आहेत. गैरसमज पसरवत आहेत. हिंदू धर्म ही जीवनपद्धती आहे.