जोहान्सबर्ग : पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी दक्षिण आफ्रिकेच्या तीन दिवसांच्या अधिकृत दौऱ्यासाठी जोहान्सबर्गयेथे दाखल झाले. या दरम्यान ते 15 व्या ब्रिक्स परिषदेत सहभागी होतील. तसेच ते अनेक जागतिक नेत्यांसोबत द्विपक्षीय बैठका देखील घेतील. राष्ट्राध्यक्ष सिरिल रामाफोसा यांच्या निमंत्रणावरून मोदी 22 ते 24 ऑगस्टदरम्यान दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहेत. 2019 नंतर आफ्रिका ब्रिक्स देशांच्या (ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका) पहिल्या थेट शिखर परिषदेचे आयोजन करत आहे. यावेळी चांद्रयान ३ च्या लँडिंगदरम्यान पंतप्रधान मोदी देशाशी डिजिटल माध्यमातून कनेक्ट होतील.
मंगळवारी सकाळी रवाना झाले होते : मंगळवारी सकाळी दक्षिण आफ्रिकेला रवाना होण्यापूर्वी दिलेल्या निवेदनात पंतप्रधान मोदी म्हणाले की, ब्रिक्स देश विविध क्षेत्रात मजबूत सहकार्याचा अजेंडा स्वीकारत आहेत. 'ब्रिक्स देशांना भविष्यातील सहकार्याची क्षेत्रे ओळखण्याची आणि संस्थात्मक घडामोडींचा आढावा घेण्यासाठी ही शिखर परिषद उपयुक्त संधी देईल', असे मोदी म्हणाले.
विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी व्यासपीठ प्रदान करेल : त्यानंतर त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर आपल्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्याबद्दल पोस्ट केले. 'मी जोहान्सबर्ग येथे होणार्या ब्रिक्स परिषदेत सहभागी होण्यासाठी दक्षिण आफ्रिकेला जात आहे. मी BRICS-Africa Outreach आणि BRICS Plus संवाद कार्यक्रमांमध्ये देखील सहभागी होणार आहे', असे मोदींनी लिहिले. 'ब्रिक्स शिखर परिषद ग्लोबल साउथ आणि विकासाच्या इतर क्षेत्रांच्या चिंतेच्या विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान करेल', असेही ते म्हणाले.