नवी दिल्ली: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज हैदराबाद हाऊस येथे नेपाळचे पंतप्रधान शेर बहादूर देउबा यांची भेट घेतली. पंतप्रधान मोदींच्या निमंत्रणानंतर नेपाळचे पंतप्रधान शुक्रवारी राष्ट्रीय राजधानीत तीन दिवसांच्या अधिकृत दौऱ्यावर आले होते. दोन्ही पंतप्रधानांनी द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्याच्या मार्गांवर आणि दोन्ही देशांच्या लोकांच्या परस्पर फायद्यासाठी विविध क्षेत्रात सहकार्य वाढवण्याच्या मार्गांवर विचार विनिमय केला. द्विपक्षीय चर्चेनंतर पंतप्रधान देउबा आणि पंतप्रधान मोदी जनकपूर-जयनगर ट्रेनचे लोकार्पण करणार आहेत.
शुक्रवारी, नेपाळच्या पंतप्रधानांनी भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा (BJP president JP Nadda) यांची पक्षाच्या मुख्यालयात भेट घेतली आणि नेपाळी काँग्रेस आणि भाजपमधील संबंध मजबूत करण्यावर चर्चा केली. नेपाळच्या पंतप्रधानांसोबत त्यांची पत्नी आरजू देउबा, परराष्ट्र मंत्री नारायण खडका, ऊर्जा आणि जलसंपदा मंत्री पम्फा भुसाळ आणि आरोग्य मंत्री महेंद्र राय यादव या वेळी उपस्थित होते. भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान देउबा या बैठकीला उपस्थित होते.