नवी दिल्ली - आज सत्य, न्याय आणि अहिंसेचा विजय झाला आहे. 700 हून अधिक शेतकरी कुटुंबांनी न्याय मिळवण्यासाठी या आंदोलनात बलिदान दिले, त्यांचा आज विजय असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी तीन कृषी कायदे रद्द केल्यानंतर दिली आहे.
PM Modi Address To Nation : तीनही कृषीकायदे रद्द होणार; पंतप्रधान मोदींची घोषणा - तीन कृषी कायदे रद्द

17:16 November 19
आज सत्य, न्याय आणि अहिंसेचा विजय - सोनिया गांधी
16:15 November 19
सरकारने चर्चा न करताच कृषी कायदे लागू केले होते - शरद पवार
मी स्वतः सर्व राज्यांच्या कृषी मंत्र्यांकडून सल्ला मागितला होता, परंतु या सरकारने चर्चा न करता तीन कृषी कायदे लागू केले. मी 10 वर्षे केंद्रीय कृषीमंत्री म्हणून राज्याचा विषय असलेल्या शेतीच्या प्रश्नावर काम केले आहे. सर्व संबंधितांना विश्वासात घेतल्याशिवाय, शेतीविषयक कायद्यांशी संबंधित कोणतेही नवीन उपाय करणे योग्य नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी तीन शेतीविषयक कायदे रद्द केल्यानंतर दिली.
15:34 November 19
सर्वांना विश्वासात घेऊन निर्णय घ्यावेत म्हणजे अशी नामुष्की ओढवणार नाही - मुख्यमंत्री ठाकरे
मुंबई -सरकारला उपरती झाली आणि आता कृषी कायदे (Farmers Law) मागे घेण्याची घोषणा केली. सर्वसामान्य माणूस या देशात काय करू शकतो आणि त्याची ताकद काय असते याचे हे उदाहरण आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी व्यक्त केली आहे. तसेच कोणतेही कायदे करताना विरोधकांसह जनतेला विश्वासात घ्यायला हवे, असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना लगावला आहे.
10:59 November 19
आंदोलन मागे घेतले जाणार नाही - राकेश टिकेत
पालघर (महाराष्ट्र) - आंदोलन तत्काळ मागे घेतले जाणार नाही. जोपर्यंत संसदेत हे कायदे रद्द होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच राहाणार असा पवित्रा शेतकरी आंदोलनाचे नेते राकेश टिकेत यांनी घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच बरोबर पंतप्रधानांनी दिल्ली सीमेवर आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांना आपापल्या घरी परत जाण्याचे आवाहन केले आहे.
10:13 November 19
कृषी कायदे रद्द झाल्यानंतर नवाब मलिकांचे ट्वीट
10:11 November 19
कृषी कायदे रद्द केल्यानंतर राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया
10:04 November 19
देशात एकजूट असेल तर कोणताही निर्णय बदलला जाऊ शकतो - नवाब मलिक
मुंबई - केंद्र सरकारने तिन्ही कृषी कायदे मागे घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी ट्विट करत देशात एकजूट असेल तर कोणताही निर्णय बदलला जाऊ शकतो, असे म्हटले आहे. नवाब मलिकांनी ट्विट केले आहे, की
'झुकती है दुनिया झुकाने वाला चाहिए'
तीनों कृषि कायदे वापस लिए गए,
हमारे देश के किसानों को मेरा सलाम और शहीद किसानो को अभिवादन'
09:19 November 19
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मोठा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांचा विरोध होत असलेले तिन्ही कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला संबोधित करताना सांगितले आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले, आम्ही शेतकऱ्यांना या कायद्याबद्दल समजून सांगण्यात कमी पडलो, त्या बद्दल देशाची माफी मागतो.
09:18 November 19
पंतप्रधान मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे
- केंद्र सरकारचे कृषी बजेट पाच टक्क्यांनी वाढवले गेले आहे. प्रत्येक वर्षी सव्वा लाख कोटी रुपये कृषीवर खर्च होत आहे.
- छोट्या शेतकऱ्यांना ताकद देण्यासाठी दहा हजार एफपीओ तयार केले गेले आहेत.
- पीक कर्जाची मर्यादाही आम्ही दुप्पट केली आहे.
- पशूपालकांना आता किसान क्रेडिट कार्ड मिळण्यास सुरुवात झाली आहे.
- शेतकऱ्यांसाठी आमचे सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे.
- शेतकऱ्यांची सामाजिक आणि आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी तीन कृषी कायदे तयार करण्यात आले.
- छोट्या शेतकऱ्यांना अधिक ताकद मिळण्यासाठी हे कायदे आणले गेले.
- अनेक वर्षांपासून देशातील कृषी संघटना, कृषी संशोधक, याची मागणी करत होते.
- कोटी कोटी शेतकरी आणि अनेक कृषी संघटनांनी या कायद्यांचे स्वागत केले होते.
- शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि शुद्ध पद्धतीने शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी हे कायदे आणण्यात आले.
- कृषी अर्थशास्त्री, प्रगतीशील शेतकऱ्यांनी हा कायदा समजावण्याचा प्रयत्न केला.
- आम्हीही देखील शेतकऱ्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. कोणतीही कसर ठेवली नाही.
- ज्या मुद्यांवर शेतकऱ्यांना आक्षेप होता, त्यात बदल करण्याचीही तयारी ठेवली.
09:07 November 19
PM LIVE
नवी दिल्ली -आमच्या सरकारने शेतकऱ्यांसाठी विविध योजना आणल्या आहेत. तसेच शेतकऱ्यांना योग्य नुकसानभरपाई मिळण्यासाठी कायद्यातही बदल केला आहे. छोट्या शेतकऱ्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांच्या खात्यात १ लाख ६२ हजार थेट त्यांच्या खात्यात जमा केले.