नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी २८ नोव्हेंबरला पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटला भेट देणार आहेत. कोरोना व्हायरसवरच्या लसनिर्मितीची प्रक्रिया कुठेपर्यंत आली याची पाहणी ते करणार आहेत. त्यापूर्वी मोदी गुजरातला जातील. तेथील झायडस-कॅडिला प्लांटला भेट देतील. पुणे दौरा आटोपल्यावर मोदी हैदराबादला जाणार आहोत. येथील भारत बायोटेकच्या प्लांटला मोदी भेट घेतली. त्यानंतर हैदराबाद येथून ते दिल्लीच्या दिशेने उड्डाण करतील.
सिरम इंस्टिट्यूटला भेट देणार -
पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटकडून कोरोनावरती वॅक्सिन तयार केले जात आहे. त्या वॅक्सिन निर्मितीची प्रक्रिया कुठेपर्यंत आली आहे हे पाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 नोव्हेंबरला पुण्यात येणार आहे. त्या दृष्टीने प्रशासनाच्या हालचाली सुरू झाल्या असून विभागीय आयुक्त कार्यालयात त्यासाठी नुकतीच एक बैठकही आयोजित करण्यात आली होती.
आधी गुजरातला जाणार मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी ९ वाजता दिल्लीहून अहमदाबादला पोहोचतील. त्यानंतर अहमदाबाद जिल्ह्यातील चांगोदार येथील झायडस-कॅडिलाच्या प्लांटला भेट देतील. झायडस-कॅडिला ZyCov-D नावाची लस बाजारपेठेत आणणार आहे. या कामाची पाहणी मोदी करणार आहेत. सकाळी ११पर्यंत मोदी गुजरातमध्ये असतील. यानंतर हैदराबादला रवाना होतील.
हैदराबाद दौरा
हैदराबादमधील हकिमपेट विमानतळावर मोदींचे आगमन होईल. तेथून मोदी शामिरपेठ येथील भारत बायोटेकच्या प्लांटला भेट देतील. यानंतर पुन्हा मोदी हकिमपेठ विमानतळावर परत येतील. त्यानंतर ते पुण्याच्या दिशेने रवाना होतील. हैदराबाद येथे भारत बायोटेककडून Covaxin ची निर्मिती करण्यात येत आहे.
पंतप्रधानांचा दौरा हैदराबाद-पुणे दौऱ्याचे वेळापत्रक. पुणे दौरा
पंतप्रधान मोदी सायंकाळी 4 वाजून 25 मिनिटं ते 5 वाजून 25 मिनिटं असा 1 तास सिरम संस्थेत असतील. ऑक्सफर्ड विद्यापिठाच्या मदतीने येथे AstraZeneca ही लस तयार करण्यात येत आहे, त्याची माहिती मोदी घेतील. यानंतर ते दिल्लीच्या दिशेने प्रयाण करतील.
लसीच्या चाचण्या अंतिम टप्प्यात -
ऑक्सफर्ड विद्यापीठाने तयार केलेल्या कोरोना लसीचे उत्पादन सीरम इन्स्टिट्यूट मध्ये करण्यात येणार आहे. कोविशिल्ड या लसीच्या चाचण्या सध्या अंतिम टप्प्यात आहेत.
नव्या वर्षाच्या सुरुवातीला उपलब्ध होणार लस -
ऑक्सफोर्ड अॅस्ट्राझेन्का ही कोरोनावरील लस सर्वप्रथम आरोग्य कर्मचाऱ्यांना आणि ज्येष्ठांना फेब्रुवारी २०२१मध्ये मिळेल. त्यानंतर एप्रिलमध्ये सर्वसामान्यांना लस मिळेल. कोरोना लसीच्या दोन डोसची किंमत जास्तीत जास्त १ हजार रुपये असणार आहे. कोरोनाची लस २०२४पर्यंत देशातील सर्वांना मिळेल, असे अदार पुनावाला यांनी नुकतेच सांगितले. तर, कोरोनाची लस देशातील सर्वांना मिळण्यासाठी दोन ते तीन वर्षे लागण्याची शक्यता आहे. फक्त पुरवठाच नव्हे तर बजेट, लॉजिस्टिक्स, पायाभूत सुविधा या कारणाने लस प्रत्येकापर्यंत पोहोचण्यासाठी वेळ लागणार आहे. भारत सरकारला ही लस ३ ते ४ डॉलरला मिळणार आहे. कारण, भारत मोठ्या प्रमाणात लस खरेदी करणार आहे. कोरोनाच्या इतर लसीहून आमच्या लसीची किंमत कमी असेल, असेही पुनावाला यांनी सांगितले होते.