वाराणसी PM Modi to inaugurate Eastern Dedicated Freight Corridor : पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसीय वाराणसी दौऱ्यावर आहेत. आज दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी पंतप्राधान मोदी ईस्टर्न डेडिकेटेड फ्राईट कॉरिडॉरच्या नवीन दीनदयाल उपाध्याय जंक्शन ते नवीन भाऊपूर जंक्शन पर्यंत 402 किमी लांबीचा रेल्वे मार्ग देशाला समर्पित करणार आहेत.
- नवीन दीनदयाळ उपाध्याय जंक्शन ते नवीन भाऊपूर जंक्शन विभागाचं उद्घाटन हा ईस्टर्न डेडिकेटेड फ्राईट कॉरिडॉरचा एक महत्त्वाचा भाग आहे. तब्बल 10 हजार 903 कोटी रुपये खर्चून बांधलेला हा विभाग दिल्ली-हावडा रेल्वे मार्गावर स्थित आहे. हा कॉरिडॉर उत्तर प्रदेशातील चंदौली, मिर्झापूर, प्रयागराज, कौशांबी, फतेहपूर, कानपूर नगर आणि कानपूर देहत या जिल्ह्यांमधून जातो.
मालवाहतूकीला बळ मिळेल :या मार्गावर सहा जंक्शन स्टेशन आणि सहा क्रॉसिंग स्टेशन्ससह एकूण 12 स्टेशन्सचा समावेश आहे. हा कॉरिडॉर झारखंड आणि पश्चिम बंगालच्या कोळसा क्षेत्रांना जोडतो. इस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड, सेंट्रल कोलफिल्ड्स लिमिटेड, भारत कोकिंग कोल लिमिटेड आणि नॉर्दर्न कोलफिल्ड्स लिमिटेड, आदी प्रकल्पांना हा मार्ग जोडतो. या कॉरिडॉरवर 100 किमी/ताशी वेगानं मालवाहू गाड्या धावत असल्यानं, वीज प्रकल्पांना कोळशाचा जलद पुरवठा केल्यानं खर्च आणि वेळ कमी झाला आहे. याव्यतिरिक्त, लोखंड आणि स्टीलसह जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक अधिक कार्यक्षम झालीय.