नवी दिल्ली -आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल होण्याचे संकेत मिळत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केंद्रीय मंत्रीमंडळाची बैठक बोलावली आहे. या बैठकीत पंतप्रधान मोदी केंद्रीय मंत्र्यांच्या कामाचा आढावा घेणार आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. पंतप्रधानांची बैठक अत्यंत महत्वाची मानली जाते.
संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होण्यास अजून काही दिवस शिल्लक आहेत. मात्र, त्यापूर्वीच मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा जोरात सुरू आहे. यासंदर्भात कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नसली तरी 19 जुलैपासून पावसाळी अधिवेशन सुरू होण्याची शक्यता आहे. राजकीय वर्तुळात पावसाळी अधिवेशनापेक्षा जास्त चर्चा मंत्रिमंडळाच्या विस्तारावर सुरू आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात दोन नावे आघाडीवर आहेत. यात आसामचे माजी मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल आणि दुसरे ज्योतिरादित्य सिंधिया यांचे नाव आहे.
राज्यातील आगामी विधानसभा निवडणुका आणि मंत्र्यांचे काम त्याचा रोडमॅप ठरवेल. पंतप्रधान तीन किंवा चार मंत्र्यांच्या कामगिरीवर समाधानी नाहीत. केंद्रीय मंत्रिमंडळातून ते काम न करणार्या मंत्र्यांना हटवू शकतात. मंत्रिमंडळात सुमारे एक डझन नवीन चेहर्यांचा समावेश असू शकतो. उत्तर प्रदेश आणि गुजरातला विशेष प्रतिनिधित्व मिळू शकेल.