संयुक्त राष्ट्र :पंतप्रधान नरेंद्र मोदी 21 जूनला संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात नवव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पहिल्या योग सत्राचे नेतृत्व करणार आहेत. योगाच्या अनेक फायद्यांबद्दल जगभरात जागरुकता निर्माण करणे, हे आंतरराष्ट्रीय योग दिनाचे उद्दिष्ट आहे. संयुक्त राष्ट्रांनी 2014 मध्ये 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून घोषित केला. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पंतप्रधान मोदी संयुक्त राष्ट्र महासभेच्या व्यासपीठावरून प्रथमच संबोधित करणार आहेत.
विशेष सत्रासाठी योगास अनुकूल पोशाख : योग सत्र 21 जून रोजी सकाळी 8 ते 9 या वेळेत संयुक्त राष्ट्र संघाच्या मुख्यालयातील नॉर्थ लॉनमध्ये पार पडणार आहे. जिथे गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये संयुक्त राष्ट्र संघाच्या कार्यालयात महात्मा गांधींचा पुतळा स्थापित करण्यात आला होता. ऐतिहासिक योग सत्रात संयुक्त राष्ट्रांचे सर्वोच्च अधिकारी, राजदूत, सदस्य देशांचे प्रतिनिधी तसेच जागतिक समुदायातील प्रमुख सदस्य देश सहभागी होण्याची शक्यता आहे. सल्लागार अतिथी आणि उपस्थितांना विशेष सत्रासाठी योगास अनुकूल पोशाख घालण्यास प्रोत्साहित करत आहे. सत्रादरम्यान योग मॅट्स प्रदान करण्यात येणार आहे.