नवी दिल्ली - कोरोना लसीची प्रतिक्षा अखेर संपली असून उद्या (शनिवार) देशभरात लसीकरण मोहिमेची सुरूवात होत आहे. या मोहिमेची सुरूवात पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार आहे. देशभरातील आरोग्य कर्मचाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मोदी संवाद साधण्याची शक्यता आहे. सीरम आणि भारत बायोटेकची लस देशभरात पोहच करण्यात आली असून लसीकरणाची तयारी सुरू आहे. उद्यापासून प्राधान्य क्रमाने आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस टोचण्यात येणार आहे.
कोविन अॅपचे उद्घाटन करणार -
यावेळी पंतप्रधान मोदी कोविन (Co-WIN) व्हॅक्सिनेशन इंटेलिजन्स नेटवर्क या अॅपचे उद्घाटन करण्याची शक्यता आहे. कोरोना लसीकरणाचे व्यवस्थापन करण्यासाठी कोविन हे अॅप तयार करण्यात आले आहे. लस पुरवठा, साठवण, लसीकरणाची माहिती आणि आकडेवारी या गोष्टींचे व्यवस्थापन या अॅपद्वारे करता येणार आहे.
जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहिम -
पंतप्रधान मोदी १६ जानेवारीपासून देशभरात कोरोना लसीकरणाची सुरूवात करत आहेत. ही जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहिम असणार आहे. त्यामुळे पोलीओ लसीकरण कार्यक्रमही ३१ जानेवारीला पुढे ढकलण्यात आला आहे, असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. कोरोना लसीकरणासाठी देशभरात २ हजार ९३४ बुथ सज्ज ठेवण्यात आले आहेत. आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात येणार असून यातील काही लाभार्थ्यांशी मोदी संवाद साधणार आहेत. सुमारे ३ लाख आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण होणार आहे.
सर्वांना मोफत लस द्या - संसदीय समिती
दरम्यान, संसदेच्या आरोग्य विषयक समितीने कोरोना लस सर्वांना मोफत देण्याची शिफारस केली आहे. देशातील गरीबांसह सर्वांचे लसीकरण करण्यासाठी लस मोफत देण्यात यावी, असे समितीने म्हटले. देशातील विविध शहरांत लसीचा पुरवठाही करण्यात आला आहे. लसीची कार्यक्षमता तपासण्यासाठी बारकाईने निगराणी ठेवण्याची गरजही समितीने व्यक्त केली आहे.