नवी दिल्ली - भारतीय स्वातंत्र्याचे 75 वे वर्ष देशभरात साजरे करण्यात येत आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या पंचाहत्तरीनिमित्त अमृत महोत्सव कार्यक्रमाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. 15 ऑगस्ट 2022 च्या 75 आठवडे आधी हे जन भागीदारीचे कार्यक्रम सुरू होतील.
पंतप्रधान मोदी आज गुजरातच्या अहमतादबादमधील साबरमती आश्रमातून पदयात्रेला हिरवा कंदील दाखवणार आहेत. साबरमती ते दांडी अशा 241 मैल पदयात्रेत 81 पदयात्री सहभागी होणार आहेत.केंद्रीय सांस्कृतिक मंत्री प्रल्हाद सिंह पटेल हे पदयात्रेच्या 75 किलोमीटरच्या टप्प्याचं नेतृत्व करणार आहेत. यावेळी गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत, केंद्रीय सांस्कृतिक मंत्री प्रल्हाद सिंह पटेल आणि गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी उपस्थित राहतील.
पंतप्रधान मोदी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवशी निगडीत अनेक सांस्कृतिक आणि डिजिटल कार्यक्रमांचे उद्घाटन करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टि्वट करून पदयात्रेसंदर्भात माहिती दिली होती. मिठाच्या सत्याग्रहाची सुरुवात दांडी यात्रेने झाली. ही दांडी यात्रा साबरमती आश्रमापासून 12 मार्च 1930 रोजी सुरू झाली होती, असे टि्वट त्यांनी केले.
दांडी यात्रा -
मिठाच्या सत्याग्रहाची सुरुवात दांडी यात्रेने झाली. ही दांडी यात्रा (मोर्चा) साबरमती आश्रमापासून 12 मार्च 1930 रोजी सुरू झाली. गांधीजींच्या बरोबर अनुयायी होते. ही यात्रा जवळपास 24 दिवस चालली. 6 एप्रिल 1930 ला दांडी येथे समुद्रकिनारी ही यात्रा पोहचली. त्या दिवशी जेव्हा सकाळी साडे सहा वाजता गांधीजींनी चिमूटभर मीठ उचलून कायदेभंग केला. या घटनेकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिले होते. यानंतर अन्यायकारक आंदोलने मोडीत काढण्यासाठी परकीय सरकारच्या कायद्यांना आव्हान देण्याची हिंमत लोकांमध्ये संचारली होती.