नवी दिल्ली - पंतप्रधान मोदी उद्या (शुक्रवार) मध्यप्रदेशातील शेतकऱ्यांसोबत संवाद साधणार आहेत. व्हिडिओ कॉन्फन्सिंगद्वारे मोदी शेतकरी संमेलनात सहभागी होणार आहेत. राजधानी दिल्लीच्या सीमेवर मागील २२ दिवसांपासून नव्या कृषी कायद्यांविरोधात ठिय्या आंदोलन सुरू आहे. तिन्ही कायदे सरकारने आधी रद्द करावे, त्यानंतरच चर्चा करू, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. त्यामुळे पंतप्रधान शेतकऱ्यांशी काय बोलतात, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
गुजरातमध्ये विरोधकांवर केली टीका -
नुकतेच गुजरात येथे विविध विकास कामांचे उद्घाटन करण्यास गेले असता पंतप्रधान मोदींनी शेतकरी आंदोलनावर वक्तव्य केले होते. नव्या कृषी कायद्यांवर विरोधक शेतकऱ्यांची दिशाभूल करत असल्याचा आरोप मोदींनी केला होता. शेतकऱ्यांच्या मागे राहून विरोधक सरकारवर हल्ला करतायेत. कृषी क्षेत्रातील या सुधारणा विरोधकांनाही करायच्या होत्या मात्र, त्यांना सत्तेत असताना ते जमले नाही. भाजपने सुधारणा करून दाखविल्या, असे मोदी म्हणाले. कच्छमधील शेतकऱ्यांच्या पंतप्रधानांनी समस्या जाणून घेतल्या होत्या तसेच त्यांच्याशी चर्चा केली होती.