नवी दिल्ली :पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकलेल्या जो बायडेन यांच्यासोबत संवाद साधला. मोदींनी त्यांना फोन करत विजयाबद्दल अभिनंदन केले. तसेच भारत-अमेरिका संबंधांबाबत आणि कोरोना महामारीबाबतही चर्चा केली. बायडेन यांच्या विजयानंतर पहिल्यांदाच या दोघांमध्ये चर्चा झाली आहे. पंतप्रधान मोदींनी ट्विट करत याबाबत माहिती दिली.
कमला हॅरिस यांचेही केले अभिनंदन..
यासोबतच, पंतप्रधानांनी यावेळी कमला हॅरिस यांचेही अभिनंदन केले. "भारतीय-अमेरिकी लोकांसाठी ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. अमेरिका आणि भारतातील संबंध अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने हे एक मोठे पाऊल आहे" अशा आशयाचे ट्विट त्यांनी केले.
जुन्या आठवणींना उजाळा..
यावेळी बोलताना मोदी यांनी २०१४ आणि २०१६ मधील आठवणींना उजाळा दिला. २०१४ मध्ये पंतप्रधान म्हणून मोदींच्या पहिल्या अमेरिका दौऱ्यामध्ये बायडेन यांनी मोदींना दुपारच्या जेवणासाठी आमंत्रित केले होते. तसेच, २०१६ मध्ये मोदी जेव्हा अमेरिकेच्या काँग्रेसला संबोधित करत होते, तेव्हा बायडेन तेथील अध्यक्षस्थानी होते. अमेरिकेतील भारतीय राजदूताने ही माहिती दिली.
भारत अमेरिका संबंध मजबूत होतील
बायडेन यांच्या विजयानंतर पंतप्रधान मोदींनी ट्विट करत त्यांचे अभिनंदन केले होते. बायडेन उपाध्यक्ष असताना भारत-अमेरिका संबंध मजबूत करण्यासाठी त्यांनी केलेले काम हे अतुलनीय असल्याचे मोदींनी म्हटले होते. तसेच, आता बायडेन आणि कमला यांच्या कार्यकाळात हे संबंध अधिक बळकट होतील असा विश्वासही मोदींनी व्यक्त केला होता.
हेही वाचा :कोविड-19 मुळे द्वितीय विश्वयुद्धाप्रमाणेच प्रत्येक क्षेत्रात नवीन प्रोटोकॉल विकसित करण्याची संधी - मोदी