नवी दिल्ली - देशभरात कोरोनाच्या सावटाखाली होळीचा सण साजरा केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस आणि राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्यासह देशातील अनेक नेत्यांनी होळीनिमित्त देशासियांना शुभेच्छा दिल्या आहेत.
'आपणा सर्वांना होळीच्या शुभेच्छा. आनंद आणि अतिउत्साहीपणाचा हा सण प्रत्येकाच्या जीवनात नवीन जोम आणि उर्जा आणू शकेल, असे मोदींनी टि्वटमध्ये म्हटलं.
अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांनीही भारतीयांना शुभेच्छा दिल्या आहेत. होळीच्या शुभेच्छा! होळीमध्ये आपण रंग आपल्या मित्र आणि प्रियजनांवर फेकतो. आनंदाने भरलेला, होळीचा सण सकारात्मकतेबद्दल आहे, असे टि्वट कमला यांनी केले. मतभेद विसरून एकत्र यावं, असा संदेश त्यांनी दिला आहे.
ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी भारतीयांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी एक व्हिडिओ जारी केला आहे. ऑस्ट्रेलियामधील हिंदू नागरिक, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि होळी साजरी करत असलेल्या प्रत्येकाला होळीच्या शुभेच्छा. एकतेच्या भावनने मी तुम्हा सर्वांना होळीच्या शुभेच्छा देतो, असे त्यांनी म्हटलं.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी टि्वट करून देशवासियांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 'देशवासियांना होळीच्या शुभेच्छा. रंगांचा उत्सव म्हणजे होळी हा सामाजिक समरसतेचा सण आहे. हा सण आयुष्यात आनंद, उत्साह आणि आशा आणतो. हा उत्सव आपल्या सांस्कृतिक विविधतेमध्ये रुजलेल्या राष्ट्रीय चेतनाला अधिक सामर्थ्य देईल, असे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी टि्वट केले
गृह मंत्री अमित शहा यांनी ट्विट करुन सर्व देशवासियांना होळीच्या शुभेच्छा दिल्या. रंग, ऐक्य आणि सद्भावनांचा हा महापर्व सण आपणा सर्वांना आनंद, शांती आणि शुभेच्छा देवो, असे शाह यांनी टि्वटमध्ये म्हटलं.
कोरोना मार्गदर्शक सूचनांची काळजी घेण्याचे आवाहन काँग्रेस नेते राहुल गांधींनी केले. देशाच्या विविधतेच्या सर्व रंगांचा उत्सव होळी, तुम्हा सर्वांना हार्दिक अभिवादन. कोरोना मार्गदर्शक तत्त्वांचे अनुसरण करा आणि सुरक्षित राहा, असे टि्वट राहुल गांधी यांनी केले.