नवी दिल्ली Ram Mandir postage stamp :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज श्री रामजन्मभूमी मंदिराच्या स्मरणार्थ टपाल तिकीट जारी केलंय. याशिवाय त्यांनी प्रभू श्रीराम यांच्यावर जगभरात प्रसिद्ध झालेल्या तिकीटांचं पुस्तकही प्रकाशित केलं आहे. टपाल तिकिटाच्या डिझाईनमध्ये राम मंदिर, चौपई 'मंगल भवन अमंगल हरी', सूर्य, शरयू नदी तसंच मंदिराभोवतीच्या मूर्तींचा समावेश आहे. भारत तसंच अमेरिकेसह एकूण 21 देशांमध्ये भगवान रामावरील टपाल तिकिटं जारी करण्यात आली आहेत.
एकूण 6 टपाल तिकिटांचा समावेश :पंतप्रधान मोदींच्या हस्ते जारी करण्यात आलेल्या स्टॅम्प्सच्या पुस्तकात 6 तिकिटांचा समावेश करण्यात आला आहे. यात राम मंदिर, भगवान गणेश, भगवान हनुमान, जटायू, केवलराज, माँ शबरी यांच्यावरील टपाल तिकिटांचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं की, 'आज राम मंदिराशी संबंधित 6 टपाल तिकिटं जारी करण्यात आली. तसंच, भगवान श्रीराम यांच्याशी संबंधित टपाल तिकिटांचा अल्बम देखील प्रकाशित करण्यात आला आहे. पीएम मोदींनी जारी केलेल्या पुस्तिकेत 48 पानं आहेत. यामध्ये 20 देशांच्या तिकिटांचा समावेश करण्यात आला आहे. या देशांमध्ये प्रामुख्याने अँटिग्वा, बारबुडा, ऑस्ट्रेलिया, कंबोडिया, कॅनडा, झेक प्रजासत्ताक, फिजी, जिब्राल्टर, गयाना, ग्रेनाडा, इंडोनेशिया, नेपाळ, न्यूझीलंड, सिंगापूर, श्रीलंका, थायलंड, अमेरिका देखाचा समावेश करण्यात आला आहे.