भंडारा - जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या अतिदक्षता नवजात शिशु केअर युनिटमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. या आगीत १० बालकांचा मृत्यू झाला. शनिवारी रात्री दोन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या दुर्दैवी घटनेची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली असून त्यांनी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांशी चर्चा करत माहिती घेण्याबरोबर चौकशीचे आदेश दिले. देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, काँग्रेसचे नेते राहुल गांधींसह मान्यवरांनी भंडाऱ्यातील या घटनेबद्दल हळहळ व्यक्त केली.
रामनाथ कोविंद, नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी केलेले ट्विट... राहुल गांधी आणि नितीन गडकरी यांनी केलेले ट्विट... देवेंद्र फडणवीस यांनी केलेले ट्विट राज्यपाल भगतसिंह कोश्यारी -
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील शिशु केअर यूनिटला आग लागुन झालेल्या दुर्घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील आगीच्या दुर्दैवी घटनेचे वृत्त समजून तीव्र दु:ख झाले. घटनेत प्राण गमावलेल्या निष्पाप बालकांच्या कुटुंबीयांना आपल्या शोकसंवेदना कळवतो, असे राज्यपालांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.
मंत्री यशोमती ठाकूर
भंडारा येथे हॉस्पिटलमध्ये लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांचा दुर्दैवाने आगीत होरपळून मृत्यू झाला. यावर महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकुर यांनी ट्विट करून या आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. भंडारा येथील घटना ह्रदय पिळवटूक टाकणारी आहे, आगीत दगावलेल्या 10 नवजात बालकांच्या परिवाराच्या दुःखाची कल्पनाही करता येत नाही, बातमी ऐकल्यापासून मन सुन्न झालंय, या आगीत जखमी झालेल्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करूयात. असे ट्विट त्यांनी केले आहे.
बच्चू कडू
राज्यमंत्री बच्चू कडू यांनी देखील भंडारा घटनेवर दु:ख व्यक्त केले आहे. या घटनेमागे कुणाचा हलगर्जीपणा आहे तो शोधला पाहिजे, असे सांगत घटनेतील दोषींवर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले. यासोबत त्यांनी महाराष्ट्रामध्ये इतर ठिकाणी अशा घटना होणार नाही याची खबरदारी घेतली जाईल, असे आश्वासन दिले आहे. आज किंवा उद्या बच्चू कडू भंडाऱ्याला जाणार आहेत.