भोपाळ : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रिमोटचे बटण दाबून आज बीनामध्ये 50 हजार 700 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विकास प्रकल्पांची पायाभरणी केली. या प्रकल्पांमुळं या बीना औद्योगिक विकासाला ऊर्जा मिळणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. या प्रकल्पांवर केंद्र सरकार 50 हजार कोटी रुपयांहून अधिक खर्च करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. पंतप्रधान म्हणाले की, येथे ज्या प्रकारे प्रकल्प सुरू आहेत त्यावरून मध्य प्रदेशसाठी आमचा संकल्प किती मोठा आहे, हे दिसून येतं. या सर्व प्रकल्पांमुळं आगामी काळात मध्य प्रदेशातील हजारो तरुणांना रोजगार उपलब्ध होणार आहे असा मोदींनी बोलताना दावा केलाय.
50 हजार कोटीच्या विकास कामांचं उद्घाटन : यामध्ये बीना रिफायनरी येथील 'पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स' आणि राज्यभरातील 10 नवीन औद्योगिक प्रकल्पांचा समावेश आहे. पंतप्रधान नर्मदापुरम जिल्ह्यात 'पॉवर अँड रिन्यूएबल एनर्जी मॅन्युफॅक्चरिंग झोन'सह 10 प्रकल्पांची पायाभरणीही करतील. यामध्ये इंदूरमधील 2 आयटी पार्क, रतलाममधील एक मेगा औद्योगिक पार्क आणि राज्यभरातील 6 नवीन औद्योगिक क्षेत्रांचाही समावेश आहे.
सनातनींनी सावध राहावे : देशाच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक सनातनींनी या देशावर प्रेम केले पाहिजं. या देशाच्या मातीवर प्रेम करणाऱ्यांनी सर्वांनी सजग राहण्याची गरज आहे. सनातनचा नायनाट करून देशाला हजार वर्षांच्या गुलामगिरीत ढकलायचा विरोधकांचा डाव आहे. पण आपण सर्वांनी मिळून अशा शक्तींना रोखायचं आहे. आपल्या संघटनेच्या बळावर तसंच आपल्या एकजुटीनं त्यांचे मनसुबे उधळून लावायचे असल्याचं मोदी म्हणाले.