बीना (मध्य प्रदेश) PM Modi on INDIA Alliance :डीएमके नेते उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्मासंबंधीच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे सध्या राजकारण चांगलंच तापलय. यावरुन आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधी पक्षाच्या इंडिया आघाडीवर तीव्र शब्दांत टीका केलीय. इंडिया आघाडीला सनातन धर्म (Sanatan Dharma) नष्ट करायचा असून भारताला हजार वर्षांच्या दास्यत्वात बुडविण्याचा कट रचल्याचा आरोप इंडिया आघाडीवर केलाय. मध्य प्रदेशातील बीना येथील सभेत पंतप्रधान मोदींनी इंडिया आघाडीवर जोरदार टीका केलीय.
इंडिया आघाडीवर जोरदार टीका : पुढे बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, घमंडिया आघाडीने नुकतीच मुंबईत बैठक घेतली. यात आघाडीचे राजकारण आणि रणनीती दोन्ही आखल्याचं दिसून येतं. या बैठकीत त्यांनी भारताचा सांस्कृतिक वारसा कमी करण्याच्या उद्देशाने एक गुप्त अजेंडा देखील तयार केलाय. भारतीयांच्या श्रद्धेवर घाला घालणं, हजारो वर्ष जुने विचार, मूल्ये आणि परंपरांनी या देशाला एकत्र बांधलं आहे. मात्र हे मोडून काढण्याभोवती इंडिया आघाडीची योजना फिरते असंही पंतप्रधानांनी म्हटलंय. अहिल्याबाई होळकरांसारख्या दिग्गजांना प्रेरणा देणारी सनातन संस्कृती आणि परंपरा नष्ट करण्याचं इंडिया आघाडीचं ध्येय असल्याचंही मोदींनी म्हटलंय. सनातन धर्मानेच झाशीची राणी लक्ष्मीबाईंना इंग्रजांना आव्हान देण्याची आणि झाशीवरची अतूट निष्ठा जाहीर करण्याची ताकद दिल्याचंही मोदी यावेळी म्हणाले. महात्मा गांधींचेही जीवन आणि विचारधारा घडवण्यातही सनातन धर्माची भूमिका असल्याचं सांगत मोदी म्हणाले, त्यांनी प्रभू रामापासून प्रेरणा घेऊन, त्याच्या अस्तित्वाचा एक आवश्यक भाग मानलं. "हे राम" या त्यांच्या शेवटच्या शब्दांवरुन हे सिद्ध होतं. तसंच स्वामी विवेकानंद आणि लोकमान्य टिळक यांच्यावरही सनातन संस्कृतीचा खोलवर प्रभाव पडला होता, असंही मोदी म्हणाले.