नवी दिल्ली -मंगळवारी भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पक्षाच्या नेत्यांना कोणत्याही चित्रपटांवर अनावश्यक वक्तव्ये करणे टाळावे अशा सूचना दिल्या. बैठकीत पंतप्रधान मोदींनी कोणत्याही पक्षाच्या नेत्याचे नाव न घेता याबाबत माहिती दिली. दिवसभर काही नेते चित्रपटांवर विनाकारण वक्तव्य करतात. मग दिवसभर वृत्तवाहिन्यांवर तीच चर्चा सुरू असते, असेही पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले. सध्या नागरिकांमध्ये शाहरुख खानच्या पठाण चित्रपटावरुन उलटसुलट चर्चा सुरू आहेत.
पठाण चित्रपटातील गाण्यावरुन सुरू आहे वाद :शाहरुख खान, दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम यांच्या भुमिका असलेला पटाण हा चित्रपट काही दिवसांपासून विरोधाचा सामना करत आहे. या चित्रपटातील बेशरम रंग हे गाणे 12 डिसेंबरला रिलीज झाले. या वादग्रस्त गाण्यात दीपिका पदुकोणने भगव्या रंगाचे कपडे परिधान केल्याने भाजप कार्यकर्त्यांनी या चित्रपटाच्या विरोधात आघाडी उघडली आहे.
भगवा आहे देशाचा अभिमान :भाजपच्या अनेक नेत्यांनी दीपिका पदुकोणने परिधान केलेल्या भगव्या कपड्यावरुन या चित्रपटावर टीका केली. यात मध्य प्रदेशचे भाजप मंत्री नरोत्तम मिश्रा, साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर आणि इतरांनी दीपिकाने भगवे कपडे परिधान केल्याबद्दल आक्षेप घेतला आहे. भगवा हा आपल्या देशाचा अभिमान आहे. हा रंग राष्ट्रध्वजावरही आहे, असे भाजप नेत्यांचे म्हणणे आहे. अशा स्थितीत असा रंग दाखवणे आक्षेपार्ह असल्याचेही भाजप नेत्यांचे मत आहे.