बेंगळुरू : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज भारताच्या द्विवार्षिक एरोस्पेस प्रदर्शन एरो इंडियाचे उद्घाटन करायला पोहचले आहेत. 'एरो इंडिया' भारताचे लष्करी विमाने, हेलिकॉप्टर, संरक्षण उपकरणे आणि नवीन युगातील एव्हीओनिक्स निर्मितीसाठी एक उदयोन्मुख केंद्र म्हणून प्रदर्शन करेल. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या पाच दिवसीय प्रदर्शनात 98 देशांतील 809 संरक्षण कंपन्या आणि प्रतिनिधी सहभागी होतील. बंगळुरूच्या बाहेरील हवाई दलाच्या येलाहंका लष्करी तळाच्या परिसरात हे प्रदर्शन होणार आहे.
75,000 कोटी रुपयांची गुंतवणूक : एरो इंडिया मध्ये सुमारे 250 बिझनेस-टू-बिझनेस करारांवर स्वाक्षरी होण्याची अपेक्षा आहे. यामुळे सुमारे 75,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा मार्ग मोकळा होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. ते म्हणाले की, एरो इंडियाच्या 14 व्या आवृत्तीची थीम 'द रनवे टू ए बिलियन अपॉर्चुनिटीज' आहे. एरोस्पेस आणि संरक्षण क्षेत्रातील क्षमतांमध्ये देशाच्या वाढीचे प्रदर्शन करून सशक्त आणि स्वावलंबी 'न्यू इंडिया'च्या उदयास प्रोत्साहन देणे हा त्याचा प्रमुख उद्देश आहे.
'आत्मनिर्भर भारत' साकारण्यावर भर : सरकारच्या 'मेक इन इंडिया, मेक फॉर द वर्ल्ड' या संकल्पनेनुसार स्वदेशी उपकरणे आणि तंत्रज्ञानाचे प्रदर्शन आणि विदेशी कंपन्यांसोबत भागीदारी करण्यावर या प्रदर्शनात भर दिला जाईल. एका पत्रकार परिषदेला संबोधित करताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, 'एरो इंडिया-2023' देशाची उत्पादन क्षमता आणि पंतप्रधान मोदींच्या संकल्पनेतील 'आत्मनिर्भर भारत' साकार करण्याच्या दिशेने केलेली प्रगती अधोरेखित करेल.