गाझियाबाद PM Modi Inaugurate Namo Bharat Rail : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गाझियाबादमध्ये देशातील पहिली रॅपिड रेल्वे 'नमो भारत'ला हिरवा झेंडा दाखवतील. दिल्ली आणि मेरठ दरम्यान 82 किलोमीटर लांबीचा कॉरिडॉर बनवला जात आहे. या कॉरिडॉरच्या पहिल्या टप्प्यात ही ट्रेन साहिबााबाद ते दुहाई दरम्यान 17 किलोमीटरचं अंतर कापेल. उद्घाटनानंतर २१ ऑक्टोबरपासून लोकांना यातून प्रवास करता येणार आहे. नमो भारत ट्रेन 2025 पर्यंत दिल्लीतील सराय काले खान आणि मेरठमधील मादीपुरम या स्टेशन दरम्यान धावेल. मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांची मंजुरी मिळाल्यानंतर गेल्या आठवड्यात या रेल्वेच्या उद्घाटनाची तारीख निश्चित करण्यात आली होती. ही रॅपिड ट्रेन गुलधर मार्गे गाझियाबाद सुमारे 17 मिनिटांत दुहाई डेपोला पोहोचेल. 'नमो भारत' ही मुंबईतील मोनो आणि दिल्ली-एनसीआर मेट्रोपेक्षा खूपच वेगळी असल्याचं म्हटलं जातंय.
मोनो रेल आणि मेट्रोपेक्षा रॅपिड रेल चांगली : मुंबईत धावणारी मोनो रेल, दिल्ली-एनसीआरची मेट्रो आणि नमो भारत रॅपिड रेलमध्ये खूप फरक आहे. या रेल्वेमध्ये वेगाचा मोठा फरक आहे. वेगाच्या बाबतीत, रॅपिड रेल दोन्ही प्रकारच्या मेट्रो (मोनो आणि मेट्रो) पेक्षा वेगवान आहे. रॅपिड रेल्वे ताशी 180 किलोमीटर वेगानं धावू शकते. त्याची रचनाही चांगली आहे. याद्वारे तुम्ही दिल्ली ते मेरठ हा प्रवास अवघ्या एका तासाचा होणार आहे.