नवी दिल्ली : लोकसभेची निवडणुकांसाठी देशातील राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. आपआपल्या पक्षातील मोर्चेबांधणी करू लागले आहेत. वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या महत्त्वाच्या विधानसभा निवडणुका आणि २०२४ च्या लोकसभा निवडणुकीची भारतीय जनता पक्षाने तयारी सुरू केली आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये मोठे बदल करण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. याबाबत बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वात वरिष्ठ नेत्यांची बैठक झाली. या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनीही या बैठकीला हजेरी लावली होती.
पक्षात होणार बदल : सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या बैठकीत सरकार आणि संघटनेत बदल केला जाणार आहे. दरम्यान या बैठकीबाबत कोणतेही अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेले नाही. शाह, नड्डा आणि भाजपचे सरचिटणीस (संघटन) बीएल संतोष संघटनात्मक आणि राजकीय विषयांवर वारंवार बैठका घेत असतात. या बैठकांच्या सत्रांमध्येच ही बैठक झाली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या बैठकीत भाजपच्या संघटना आणि सरकारमधील बदलाबाबत चर्चा झाली. मिळालेल्या माहितीनुसार 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीकोनातून ही बैठक खूप महत्त्वाची होती असे सांगितले जात आहे. केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि भुपेंद्र यादव यांना परत संघटनेच्या कामा लावले जाण्याची शक्यता आहे. याचबरोबर भाजप लवकरच गुजरात आणि कर्नाटकमध्ये नव्या प्रदेशाध्यक्षांची घोषणा करणार असल्याची शक्यता आहे.