दिल्ली -काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नेतवृत्वाखाली महागाई, बेरोजगारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांवर ईडी, सीबीआयकडून सुरु असलेल्या कारवाईविरोधात आंदोलन करण्यात आलं होते. हे आंदोलन करताना सर्वांनी काळे कपडे परिधान केल होते. त्यावरुन आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर बुधवारी निशाणा साधला आहे. काही जण आता काळ्या जादू कडे वळाले आहेत. 5 ऑगस्टला काही जणांनी काळी जादू पसरवण्याचा प्रयत्न केला, असा टोलाही पंतप्रधान मोदींनी काँग्रेसला लगावला ( PM Modi Hits Congress ) आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पानीपत येथे येथे 909 कोटी रुपये खर्चून 35 एकरांवर उभारलेल्या (2G) इथेनॉल प्लांटचे उद्घाटन केले. त्यानंतर बोलताना पंतप्रधानांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडलं आहे. पंतप्रधान म्हणाले की, आपल्या देशात असे काही लोक आहेत, जे नकारात्मकतेच्या भोवऱ्यात अडकले आहेत, निराशेच्या गर्तेत बुडाले आहेत. सरकारविरुद्ध खोटे बोलूनही जनता अशा लोकांवर विश्वास ठेवायला तयार नाही. त्याच नैराश्यातून हे लोक आता काळ्या जादूकडे वळाले आहेत. काळी जादू पसरवण्याचा कसा प्रयत्न झाला ते आम्ही 5 ऑगस्टला पाहिलं. त्यांना असं वाटतं की काळे कपडे परिधान केल्याने त्यांचा निराशेचा काळ संपेल. मात्र, त्यांना हे माहित नाही की त्यांनी कितीही फुशारकी मारली, कितीही काळी जादू केली तरी जनतेचा विश्वास त्यांच्यावर पुन्हा कधीही निर्माण होणार नाही, अशी टीका पंतप्रधानांनी राहुल गांधी यांच्यावर केली आहे.