सूरत PM Modi Gujarat Visit :पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरातला भेट देणार आहेत. सूरतमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जगातील सर्वात मोठा असलेल्या सूरत डायमंड बाजाराचं उद्घाटन करणार आहेत. सूरत डायमंड बाजार 35.54 एकर जागेवर पसरला आहे. तब्बल 3 हजार 400 कोटी रुपये खर्चून सूरत डायमंड बाजार उभारण्यात आला आहे. हिऱ्यांसाठी जगातील सगळ्यात मोठा हिरे बाजार आधुनिक सुविधांसह सज्ज झाला असून सूरतमध्ये विशेष अधिसूचित क्षेत्रावर तो उभारण्यात आला आहे.
हिरे व्यापाऱ्यांसह अनेक मान्यवरांची असणार उपस्थिती :जगातील सगळ्यात मोठा हिरे बाजाराचं सूरतमध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होत आहे. या कार्यक्रमाला गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, डायमंड संघटनेचे अध्यक्ष वल्लभ लखानी, संचालक माथूर सवानी, गोविंद ढोलकिया, लालजी पटेल, सूरत डायमंड इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष दिनेश नावडिया आदींसह हिरे व्यापारातील अनेक मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.
हिरे व्यापार्यांसाठी जागतिक दर्जाचं केंद्र :आंतरराष्ट्रीय हिरे व्यापार्यांसाठी जागतिक दर्जाचं केंद्र स्थापन करणं. राज्य आणि देशाच्या अर्थव्यवस्थेत थेट योगदान देणं. नागरिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देणं या प्राथमिक उद्देशानं सूरत डायमंड बाजार विकसित करण्यात आला आहे. भारतातून हिरे, दागिन्यांची आयात, निर्यात आणि व्यापार सुलभ करणं सूरत डायमंड बाजाराचं उद्दिष्ट आहे.