नवी दिल्ली - केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर समावेश झालेल्या मंत्र्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. कोरोनाच्या काळात कोणत्याही मंत्र्यांनी जल्लोष करू नये, असे पंतप्रधानांनी निर्देश दिले आहेत. सुत्राच्या माहितीनुसार मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांना १५ ऑगस्टपर्यंत दिल्लीमध्ये थांबण्याचेही निर्देश पंतप्रधानांनी दिले आहेत.
नेते म्हणून सर्व मंत्र्यांनी जबाबदारी ओळखत जल्लोषापासून दूर राहावे, असे निर्देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्र्यांना दिल्याचे सुत्राने सांगितले. तसेच १५ ऑगस्टपर्यंत कोणत्याही नवीन मंत्र्यांनी दिल्ली सोडू नये, असेही पंतप्रधानांनी मंत्र्यांना दिलेल्या निर्देशात म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व मंत्र्यांना लवकरात लवकर मंत्रालयाची जबाबदारी स्वीकारण्याचे निर्देश दिले आहेत.
विस्तारित मंत्रिमंडळामधील मंत्र्यांनी आज पदभार स्वीकारला आहे. यामध्ये अश्विनी वैष्णव, मीनाक्षी लेखी, अनुराग ठाकूर, राजीव चंद्रशेखर, किरेन रिजीजू, दर्शना विक्रम जरदोश, रावसाहेब दानवे, मनसुख मांडवीय, डॉ. भारती पवार आणि रामचंद्र प्रसाद सिंह यांचा समावेश आहे.
हेही वाचा-देशातील कायद्याचे प्रत्येकाने पालन करावे, अश्विनी वैष्णव यांचा ट्विटरला सूचक इशारा
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर सर्व मंत्र्यांना कामकाजाचे वाटप करण्यात आले आहे. मंत्र्यांचा शपथविधी झाल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी ट्विट करत सर्व सहकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले, की मंत्र्यांच्या कार्यकाळासाठी शुभेच्छा. आपण लोकांच्या आकांक्षा पूर्ण करणे आणि समृद्ध भारतासाठी काम सुरू ठेवणार आहोत.