अयोध्या PM Modi Ayodhya Tour :पंतप्रधानांच्या स्वागतासाठी अयोध्येतील नागरिक आणि सामाजिक संस्थांकडून जोरदार तयारी करण्यात आलीय. या दौऱ्यात पंतप्रधान अयोध्येतील अत्याधुनिक विमानतळ, रामपथ, जन्मभूमी मार्गासह अयोध्या धाम जंक्शन रेल्वे स्थानकच्या नवीन इमारतींचं उद्धाटन करणार आहेत.
राज्यात 15 हजार 700 कोटींच्या प्रकल्पांचं करणार उद्धाटन :पंतप्रधान नरेंद्र मोदी पुनर्विकसित अयोध्या धाम जंक्शन रेल्वे स्थानकाचं उद्घाटन करणार आहेत. तसंच दोन नवीन अमृत भारत ट्रेन आणि सहा वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील. यासह इतर अनेक रेल्वे प्रकल्पही राष्ट्राला समर्पित करणार आहेत. यानंतर दुपारी 12.15 वाजता पंतप्रधानांच्या हस्ते नव्यानं बांधण्यात आलेल्या अयोध्या विमानतळाचं उद्घाटन होणार आहे. या विमानतळाला आता 'महर्षि वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ' असं नाव देण्यात आलंय. पंतप्रधान दुपारी 1 वाजता एका सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमात ते राज्यातील 15 हजार 700 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी करतील. यात अयोध्या आणि त्याच्या आसपासच्या परिसराच्या विकासासाठी सुमारे 11,100 कोटी रुपयांचे प्रकल्प आणि उत्तर प्रदेशातील इतर प्रकल्पांशी संबंधित सुमारे 4,600 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचा समावेश आहे.
240 कोटी रुपयांचं अयोध्या धाम रेल्वे स्थानक : पुनर्विकसित अयोध्या धाम जंक्शन रेल्वे स्थानकाच्या पहिल्या टप्प्यात 240 कोटी रुपयांहून अधिक खर्च करुन ते विकसित करण्यात आलंय. यात तीन मजली आधुनिक रेल्वे स्थानक इमारत, लिफ्ट, एस्केलेटर, फूड प्लाझा, पूजा साहित्याची दुकानं, घड्याळ कक्ष, बाल संगोपन कक्ष, वेटिंग हॉल अशा सर्व आधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे. या रेल्वे स्थानकाची इमारत 'सर्वांसाठी प्रवेशयोग्य' आणि IGBC प्रमाणित 'ग्रीन स्टेशन इमारत' असणार आहे.