नवी दिल्ली -रायगड जिल्ह्यातील तळई गावात भूस्खलन झाल्याने जवळपास 36 जणांचा मृत्यू झाला आहे. महाड तालुक्यातील तळई गावात झालेल्या या दुर्घटनेत मृतांचा आकडा वाढू शकतो. महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी मागील काही दिवसांपासून मुसळधार पाऊस बरसत आहे. यामुळे अनेक ठिकाणी दरडी कोसळ्याच्या घटना समोर आल्या आहेत.
राज्यात अनेक ठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावली आहे. मात्र कोकणात पावसामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यामधील तळीये गावात दरड कोसळून जवळपास 36 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या दुर्घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. तसेच पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या कुटुंबीयांना दोन लाखांची तर जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आलीय.
पंतप्रधान कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर हॅन्डलवरून या घटनेवर दु:ख व्यक्त करण्यात आलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यामधील तळीये गावात झालेल्या दुर्घटनेतल्या मृतांच्या कुटुंबियांना, पंतप्रधान राष्ट्रीय मदतनिधी मधून प्रत्येकी 2 लाख रुपयांचे सानुग्रह मदत तर गंभीर जखमी झालेल्यांना प्रत्येकी 50 हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे' असेही या ट्विटमध्ये म्हटलं गेलंय. घटनेनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बातचीत करून दुर्घटनेचा आढावा घेतला.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मराठीतून ट्विट करून म्हटले आहे, की महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात दरड कोसळून झालेल्या जीवितहानीबद्दल अत्यंत क्लेश वाटला. मृतांच्या कुटुंबियांप्रती सहवेदना.जखमी व्यक्ती लवकर बऱ्या व्हाव्यात ही सदिच्छा. महाराष्ट्रातील अतिवृष्टीच्या स्थितीवर लक्ष असून पावसाचा फटका बसलेल्याना आवश्यक ती मदत पुरवली जात आहे.