तिरुपूर (तामिळनाडू) Plastic Bottles Into Yarn : आजच्या काळात ग्लोबल वॉर्मिंग रोखण्यासाठी रिसायकलिंग करणं अत्यंत आवश्यक आहे. मात्र तरीही समाजामध्ये याबाबत पुरेशी जागरूकता दिसत नाही. अशा परिस्थितीत, तामिळनाडूच्या एका कंपनीनं हा विडा उचलला आहे.
प्लास्टिकच्या बाटल्यांपासून कृत्रिम धागा : तिरुपूर येथील वस्त्र आणि धागा तयार करणारी सुलोचना कंपनी टाकाऊ प्लास्टिकच्या बाटल्यांपासून धागा बनवते. विशेष बाब म्हणजे, ही कंपनी तब्बल ८६ वर्ष जुनी आहे! सध्या ही कंपनी टाकून दिलेल्या प्लास्टिकच्या बाटल्यांचा पुनर्वापर करून कृत्रिम धागा तयार करण्याचं तंत्रज्ञान यशस्वीपणे राबवत आहे. यासाठी देशाच्या विविध भागातून दररोज ७० लाख कचऱ्यात फेकलेल्या प्लास्टिकच्या बाटल्या आणल्या जातात. या प्लास्टिकच्या बाटल्यांचं कंपनीतील चार मोठ्या मशिनमध्ये सिंथेटिक फायबरमध्ये रूपांतर केलं जातं. चार स्टेप्समध्ये हे काम केलं जातं.
कशाप्रकारे केलं जातं : पहिली पायरी म्हणजे टाकाऊ बाटल्यांना बारीक करून त्याचं रुपांतर गोळ्यांमध्ये करणं. या गोळ्या वाळवल्यानंतर वितळवल्या जातात. जेव्हा त्या वितळतात, तेव्हा त्यात आवश्यक रंग जोडले जातात. याद्वारे सिंथेटिक धागा ७० रंगात तयार करून त्याचं कापसात रूपांतर केलं जातं. पुढची पायरी म्हणजे सिंथेटिक तंतूंचं यार्नमध्ये रूपांतर करणं. यार्नवर पॉलिस्टर फॅब्रिकमध्ये प्रक्रिया केली जाते, जी नेहमीप्रमाणे विणली जाऊ शकते. शेवटी हे कापड आवश्यक आकारात शिवून निर्यातीसाठी पाठवलं जातं.