बंगळुरु : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी सकाळी बंगळुरु येथील इस्रो सेंटरमध्ये चंद्रयान ३ टीमच्या शास्त्रज्ञांची भेट घेतली. पंतप्रधानांनी इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांची भेट घेत त्यांचे चंद्रयान ३ च्या यशस्वी लँडिंगबद्दल अभिनंदन केलं.
लॅंडिंगच्यावेळी खूप बेचैन होतो : इस्रोमध्ये पोहोचल्यानंतर पंतप्रधान मोदींनी शास्त्रज्ञांना संबोधित केलं. 'मला भारतात पोहोचल्यानंतर लवकरात लवकर तुमची भेट घ्यायची होती. मला तुम्हाला सलाम करायचा होता. आज मला एका वेगळ्याच आनंदाची अनुभूती येत आहे. अशा संधी फार कमी मिळतात. लॅंडिंगच्यावेळी मी खूप बेचैन होतो. मी दक्षिण आफ्रिकेत होतो, पण माझं मन तुमच्यासोबत होतं', असं पंतप्रधान मोदी म्हणाले. यावेळी शास्त्रज्ञांचे कौतुक करताना मोदी झाले भावूक झाले. त्यांचा घसा भरून आला होता.
चंद्रयान उतरलेल्या ठिकाणाचे नामांतरण केले : आता चंद्रयान ३ ज्या ठिकाणी चंद्रावर उतरलं, ते ठिकाण 'शिवशक्ती' म्हणून ओळखलं जाईल, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. तसेच चंद्रयान २ ने चंद्रावरील ज्या जागेवर पावलांचे ठसे सोडले, ती जागा 'तिरंगा' म्हणून ओळखली जाईल, असंही त्यांनी नमूद केलं.
प्रत्येक भारतीयाला आपला विजय वाटत होता : भारत चंद्रावर पोहचला ही आपल्यासाठी राष्ट्रीय अभिमानाची बाब आहे. २३ ऑगस्टचा तो दिवस, जेव्हा चंद्रयानाने चंद्राला स्पर्श केला, तो पुन्हा पुन्हा माझ्या डोळ्यांसमोर येतोय. तो क्षण अजरामर झालाय. प्रत्येक भारतीयाला हा आपला विजय वाटत होता. प्रत्येक भारतीयाला असं वाटलं की जणू तो स्वत: मोठी परीक्षा उत्तीर्ण झालाय, अशा शब्दात यावेळी पंतप्रधान मोदींनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
'जय विज्ञान-जय अनुसंधान'चा नारा दिला : शनिवारी पहाटे पंतप्रधान मोदींचे ग्रीसहून बंगळुरुला आगमन झाले. विमानतळाबाहेर त्यांची एक झलक पाहण्यासाठी लोकांची मोठी गर्दी जमली होती. कडेकोट बंदोबस्तात त्यांनी लोकांच्या शुभेच्छा स्वीकारल्या. एचएएल विमानतळाबाहेर नरेंद्र मोदींनी 'जय विज्ञान-जय अनुसंधान'चा नारा दिला. यावेळी पंतप्रधानांनी हस्तांदोलन करून सर्वांचे अभिवादन स्वीकारले.
हेही वाचा :
- Narendra Modi : नरेंद्र मोदींनी घेतली इस्रो प्रमुख एस सोमनाथ यांची भेट, चंद्रयान 3 च्या यशस्वी लँडिंगबद्दल अभिनंदन केलं
- Modi Jinping Meet : सीमेवर तणाव अन् मोदी-जिनपिंग यांच्यात भेट; दोन नेत्यांमध्ये काय झाली चर्चा?
- Chandrayaan 3: चंद्रयानाच्या लॅंडिंगनंतर प्रज्ञान रोव्हर आणि विक्रम लॅंडरची कशी आहे स्थिती?, जाणून घ्या शास्त्रज्ञांकडून माहिती