नवी दिल्ली -प्रजासत्ताक दिनी शेतकरी आंदोलकांनी दिल्लीत ट्रॅक्टर परेडचे आयोजन केले होते. मात्र, या रॅलीत हिंसाचार झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी आता हिंसाचारात सहभागी असणाऱ्या १२ संशयित आरोपींची छायाचित्रे जाहीर केली आहेत. संशयितांची माहिती देण्याचे आवाहन पोलिसांनी केले असून १०० जणांना चौकशीची नोटीस धाडण्यात आली आहे.
१२२ जणांना अटक तर ४४ गुन्हे दाखल -
दिल्ली पोलिसांनी आंदोलनातील हिंसाचाराप्रकरणी आत्तापर्यंत ४४ एफआयआर दाखल केल्या असून १२२ जणांना अटक केली आहे. तर ९ प्रकरणांची चौकशी गुन्हे शाखेकडून सुरू आहे. आंदोलकांनी लाल किल्ल्यावरही कब्जा मिळवला होता. तसेच धार्मिक ध्वज फडकावला होता. दिल्लीतील अनेक ठिकाणी पोलीस आणि आंदोलकांत झटापटी झाल्या. यात पोलीस आणि आंदोलक जखमी झाले.
६० जणांविरोधात लुकआऊट नोटीस जारी -
दिल्ली पोलिसांनी २० शेतकरी नेत्यांसह ६० जणांविरोधात लुकआऊट नोटीस जारी केली आहे. लाल किल्ल्यावर धार्मिक ध्वज फडकावण्यातील आरोपी दीप सिद्धू विरोधातही नोटीस जारी करण्यात आली आहे. यातील कोणी देश साडून पळून जाऊ नये म्हणून नोटीस जारी केल्याचे पोलिसांनी सांगितले. जय किसान आंदोलनाचे नेते अविका साहा, भारतीय किसान युनियनचे प्रवक्ते राकेश टिकैत यांच्यासह दर्शन पाल सिंह, सतनाम सिंग पन्नू, भूटा सिंग बुर्जगिल आणि जोगिंदर सिंग उघरान यांची नावे एफआयआरमध्ये आहेत.