हैदराबाद - जेनेटीक हाय कॉलेस्ट्रॉल आणि हृदयविकार असणाऱ्या लोकांना जर कोरोनाची लागण झाली, तर त्यांना हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका अधिक वाढतो. एका नव्या संशोधनामध्ये हा दावा करण्यात आला आहे. 'अमेरिकन जर्नल ऑफ प्रिवेंटिव्ह कार्डिओलॉजी' या वैज्ञानिक नियतकालिकामध्ये याबाबतचा संशोधन अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे. या अहवालात असेही म्हटले आहे, की कोविड-१९ मुळे एथेरोस्क्लेरोटीक हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आजार (एएससीव्हीडी) असणाऱ्या लोकांमध्येही हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढतो.
फॅमिलिअल हायपरकॉलेस्ट्रोलेमिया (एफएच) ही एक सामान्य अनुवांशिक स्थिती आहे, ज्यामध्ये लो डेन्सिटी लिपोप्रोटीन कोलेस्ट्रॉल (एलडीएल-सी)च्या स्तरामध्ये वाढ होते. यामुळे हृदयविकार असलेल्या रुग्णांचा धोका २० पटींनी वाढतो. संशोधकांच्या म्हणण्यानुसार, ज्या एफएच किंवा एएससीव्हीडी यांसोबतच कोविडची लागण झालेल्या लोकांना, इतर एफएच किंवा एएससीव्हीडी असणाऱ्या लोकांच्या तुलनेत (ज्यांना कोरोना झाला नव्हता) सात पटीने अधिक हृदयविकाराचे धक्के जाणवले. एफएच फाऊंडेशनच्या प्रमुख वैद्यकीय अधिकारी मॅरी मॅकगोवन यांनी सांगितले, की या संशोधनामुळे आता हृदयविकार किंवा हाय कॉलेस्ट्रॉल असणाऱ्या लोकांना एक इशारा मिळाला आहे. यामुळे ते अधिक सतर्क होतील आणि स्वतःची अधिक काळजी घेतील.