हैदराबाद Shri Ram Charan Paduka : :अयोध्येतील भव्य श्री राम मंदिरात भगवान रामाच्या चरण पादुकाही बसवण्यात येणार आहेत. त्या चरण पादुका भारतातील विविध तीर्थक्षेत्रं आणि शंकराचार्यांच्या पीठांमध्ये दर्शनासाठी जात आहेत. त्या अनुषंगाने मंगळवारी (९ जानेवारी) सायंकाळी 5:30 वाजेच्या सुमारास हैदराबादमधील रामोजी फिल्मसिटीत या पादुका आणण्यात आल्या होत्या. यावेळी राम भक्तांनी पादुकांच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.
महाप्रसादाची व्यवस्थाही करण्यात आली : अयोध्येत बांधल्या जाणाऱ्या भव्य श्री राम मंदिरात बसवल्या जाणार्या चरण पादुका लोकांना दर्शनासाठी हैदराबादला आणण्यात आल्या. सर्व तीर्थक्षेत्रांसह शंकराचार्यांच्या दर्शनानंतर त्या हैदराबाद येथील रामोजी फिल्मसिटीत पोहोचल्या. यावेळी फिल्म सिटीच्या व्यवस्थापकीय संचालक विजयेश्वरी चेरुकुरी यांनी चरण पादुका आपल्या डोक्यावर घेत येथील मंदिरात ठेवल्या. त्यानंतर उपस्थित राम भक्तांनी चरण पादुकांचं दर्शन घेतलं. यावेळी महाप्रसादाची व्यवस्थाही करण्यात आली होती.
सोन्याचा अर्कही लावण्यात आला : यावेळी ज्यांनी या चरण पादुका बनवल्या आहेत त्या श्रीनिवास यांनी ईटीव्ही भारत सोबत संवाद साधला. वेदांमध्ये भगवान श्री रामाच्या चरणी नमूद केलेली सर्व चिन्हं, या चरण पादुकावर कोरली आहेत. तसेच, या चरण पादुका त्याच आहेत ज्या पादुकांवर भारताने 14 वर्ष राज्य केलं असही श्रीनीवास यावेळी म्हणालेत. ही चरण पादुका वेदांमध्ये वर्णन केल्याप्रमाणे समान आकार आणि त्याच आधारावर तयार करण्यात आलीय. या चरण पादुकामध्ये एकूण 8 किलो चांदी आणि अष्टधातू टाकण्यात आल्याचंही त्यांनी यावेळी सांगितल. तसेच चरण पादुकेवर सोन्याचा अर्कही लावण्यात आला असल्याचं ते म्हणालेत.
१५ जानेवारीला चरण पादुका अयोध्येला पोहोचतील : ईटीव्ही भारतशी बोलताना श्रीनिवास म्हणाले की, सर्व तीर्थक्षेत्रे आणि शंकराचार्यांच्या पीठांना भेट दिल्यानंतर ही चरण पादुका हैदराबादमधील रामोजी फिल्म सिटीमध्ये आणण्यात आली आहे. श्री रामांनी वनवासात जाताना घेतलेल्या सर्व मार्गांनी ही चरण पादुका नेण्यात आली आहे. तसेच, लोकांनी सर्व ठिकाणी तीचं दर्शन घेतलं आहे. १५ जानेवारीला चरण पादुका अयोध्येला पोहोचतील, त्यानंतर विधिवत पूजेनंतर त्यांची स्थापना होईल असही श्रीनिवास यावेळी म्हणालेत.