नवी दिल्ली : केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात आज शेतकऱ्यांची ट्रॅक्टर परेड आयोजित करण्यात आली आहे. यासाठी दिल्लीच्या सीमांवर शेतकरी आंदोलकांची तयारी पूर्ण झाली असून, देशभरातील शेतकरी अजूनही दिल्लीच्या दिशेने कूच करत आहेत.
केंद्राने लागू केलेल्या कृषी कायद्यांविरोधात देशभरातील शेतकरी गेल्या दोन महिन्यांपासून दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करत आहेत. आतापर्यंत शेतकरी आणि सरकारमध्ये तब्बल १२ वेळा चर्चा होऊनही यावर कोणताही तोडगा निघाला नाही. प्रजासत्ताक दिनापर्यंत हे कायदे मागे घेतले नाहीत, तर दिल्लीमध्ये ट्रॅक्टर परेडचे आयोजन करण्यात येईल असा इशारा शेतकरी संघटनांनी यापूर्वीच दिला होता. सरकारने आतापर्यंत झालेल्या चर्चांमध्ये कायद्यांमध्ये बदल करण्याबाबत, किंवा मग काही काळासाठी कायदे थांबवण्याबाबत सुचवले होते. तसेच, सर्वोच्च न्यायालयानेही सध्या या कायद्यांवर स्थगिती आणली आहे. मात्र, हे कायदे जोपर्यंत पूर्णपणे मागे घेतले जात नाहीत, तोपर्यंत आपले आंदोलन सुरुच ठेवणार असल्याचे शेतकरी संघटनांचे म्हणणे आहे.
हजारो शेतकरी होणार ट्रॅक्टर मोर्चामध्ये सहभागी..
आज होणाऱ्या ट्रॅक्टर मोर्चामध्ये देशभरातील हजारो शेतकरी सहभागी होणार आहेत. पंजाब, हरियाणा, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान यांसह इतर राज्यांमधील शेतकरीही या मोर्चासाठी दिल्लीमध्ये दाखल झाले आहेत. शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्वात पुढे आतापर्यंत या आंदोलनात बळी गेलेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली वाहणारा ट्रॅक्टर असेल. त्यामागे १६ राज्यांचे प्रतिनिधित्त्व करणारे ट्रॅक्टर असतील. या ट्रॅक्टरांच्या मागे हजारोंच्या संख्येत इतर ट्रॅक्टर असणार आहेत. सकाळी ९च्या सुमारास दिल्लीच्या तीन सीमांवरुन या मोर्चाला सुरुवात होईल.
हेही वाचा :सिंघू सीमेवर ५० हजारांहून अधिक शेतकरी ट्रॅक्टर रॅलीच्या तयारीत..