मुंबई -गेल्या काही महिन्यात महाराष्ट्रात कोरोनाच्या उद्रेकानं उच्चांक गाठला होता. त्यानंतर रुग्णसंख्या हळूहळू कमी होत गेली. फेब्रुवारी महिन्यात परिस्थिती नियंत्रणात आल्याचं चित्र होतं, पण आता रुग्णांची संख्या पुन्हा झपाट्यानं वाढते आहे. त्यामुळे गुजरात सरकारनं महाराष्ट्रातून गुजरातमध्ये येणाऱ्या लोकांसाठी आरटीपीसीआर चाचणी अनिवार्य केली आहे.
महाराष्ट्र आणि गुजरात राज्याच्या सीमेवर पालघर जिल्हा किंवा मुंबईमधून गुजरातला जाणाऱ्या सर्व लोकांचे आरटीपीसीआर चाचणीचे अहवाल तपासण्यात येत आहेत. यासाठी वैदयकीय कर्मचारी आणि गुजरात पोलीसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
ज्या लोकांकडे 72 तासांपर्यंतचे आरटीपीसीआर अहवाल असतील, त्यांनाच गुजरात राज्यात प्रवेश देण्यात येत आहे. अन्यथा लोकांना परत पाठवलं जात आहे. मालवाहतूकदारांसाठी मात्र असे कोणतेही निर्बंध लावल्याचं दिसत नसून, महाराष्ट्रातून गुजरात राज्यात मालवाहक ट्रक्सची येजा सुरू असल्याचं दिसत आहे.
महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असून शुक्रवारीही कोरोना रुग्णसंख्येने नवा उच्चांक गाठला. शुक्रवारी राज्यात कोरोनाच्या 36 हजार 902 नव्या रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील एकूण रुग्णांची संख्या 26 लाख 37 हजार 735 वर गेली आहे. दरम्यान, कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता राज्यात रविवारपासून रात्रीची जमावबंदी लावण्यात आली आहे. भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी साधारण 8 ते 9 टक्के लोक महाराष्ट्रात राहतात. पण देशात सध्या 60 टक्के कोरोना रुग्ण महाराष्ट्रात आहेत.