हैदराबाद- देशाच्या राजकारणात काही महत्वाच्या व्यक्तींवर नजर किंवा पाळत ठेवण्याची प्रकरणे नवीन नाहीत. आता देशातील प्रमुख पत्रकारांच्यासह अनेक महत्वाच्या नेत्यांचे फॉन टॅप आणि मालवेअरचा उपयोग करुन पाळत ठेवण्यासंदर्भातील प्रकरणाने राजकारण ढवळून निघाले आहे. याबाबत एल्गार परिषदेचा विचार केल्यास अशाच प्रकारे एल्गार परिषदेतील नेत्यांच्या इलेक्टॉनिक उपकरणांमध्ये मालवेअर घुसवून त्यांच्यावर पाळत ठेवली जात होती, तसेच त्यामध्ये फेरफार तसेच सदेशांची देवाण-घेवाण केली जात होती असा आरोप झालेला आहे. एल्गार परिषदेतील प्रमुख आरोपींनी यासंदर्भात आपली बाजू वेळोवेळी कोर्टासमोर मांडलेली आहे. एल्गार परिषदेतील 8 नेत्यांवर फोनमध्ये व्हायरस सोडून हेरगिरी केल्याचे प्रकरण समोर आले होते. असा या नेत्यांचा दावा होता.
एल्गार परिषदेतील नेत्यांच्यावर पाळत -
एल्गार परिषदेतील नेत्यांच्यावर आणि तेथील सहभागींच्यावर देशाविरुद्ध कट रचून कारस्थान करण्याचा प्रमुख आरोप आहे. त्यासाठी त्यांच्याकडील उपकरणांच्यामध्ये सापडलेल्या विविध सामुग्रीचा पुरावा म्हणून दाखला देण्यात आला आहे. मात्र हे आरोप एल्गार परिषदेतील कारवाई झालेल्या आरोपींनी फेटाळून लावले आहेत. त्यावेळी हे प्रकरण एवढे गाजले होते की याबाबतच्या तपासाची बातमी थेट अमेरिकेतील वॉशिंग्टन पोस्ट या वृत्तपत्राने दिली होती. त्यामध्ये एल्गारमधील सहभागी आरोपींच्या उपकरणांमध्ये सापडलेली पत्रे आणि इतस तत्सम सामुग्री मालवेअरच्या माध्यमातून या आरोपींच्या परोक्ष त्यामध्ये घुसवली गेल्याचे सिद्ध होत असल्याचे म्हटले होते.
पुणे जिल्ह्यातील 2018 साली झालेल्या कोरेगाव भीमा येथील हिंसाचाराचा तपास सुरू झाल्यानंतर त्याअनुषंगाने 'द वॉशिंग्टन पोस्ट' ने यासंदर्भातील बातमी दिली होती. त्यामध्ये या आरोपींच्यापैकी एकाच्या लॅपटॉपमध्ये त्यांच्यानकळत त्यांच्या विरोधातील पुरावे पेरल्याचे म्हटले होते. वॉशिंग्टन पोस्टने ही बातमी अमेरिकेतील आर्सेनल कन्सल्टिंग या न्यायवैद्यक प्रयोग शाळेच्या अहवालावरुन दिली होती.
आर्सेनलच्या अहवालात असे म्हटले होते की,रोना विल्सन यांच्या लॅपटॉपवर इंटरनेट आणि घातक सॉफ्टवेअरचा वापर करून हल्ला करण्यात आला. या छुप्या हल्ल्यात त्यांच्या लॅपटॉपमध्ये अनेक कागदपत्रं पेरण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हल्ल्याचा कट रचणारी संबधित पत्रंही विल्सन यांच्या नकळत बाहेरून पेरण्यात आली होती, असेही आर्सेनलने त्यांच्या अहवालात म्हटले आहे.
या हिंसाचार प्रकरणी पुणे पोलिसांनी 2018 मध्ये अनेक विचारवंत आणि कार्यकर्त्यांना अटक केली. त्यामध्ये रोना विल्सन, सुधा भारद्वाज, गौतम नवलखा यांच्यासह किमान 14 लोकांना UAPA अंतर्गत अटक केली. त्यानंतर आजपर्यंत हा तपास आणि खटला सुरू आहे. यातील फादर स्टॅन स्वामी यांचे नुकतेच निधन झाले.
'एल्गार' नेत्यांच्या लॅपटॉमधली हार्ड डिस्क तपासणीसाठी अमेरिकेत -
ओरोपींचे वकील मिहीर देसाई यांनी विल्सन यांच्या लॅपटॉमधली हार्ड डिस्क अमेरिकेत तपासणीसाठी पाठवली होती. त्यानंतर यासंदर्भातील अहवाल देसाई यांनी कोर्टाला सादर केला होता. हायकोर्टात दाखल झालेल्या याचिकेनुसार, रोना विल्सन यांच्या वकिलांनी अमेरिकन बार असोसिएशनकडे निष्पक्ष फॉरेन्सिक चौकशीसाठी विनंती केली होती. बार असोसिएशनने हे प्रकरण 'आर्सेनल कन्सल्टिंग'कडे देण्याचं सुचवलं. ही कंपनी जगातील बहुतांश नामवंत तपास यंत्रणांना त्यांच्या तपास कार्यात मदत करते.