पाटणा : बिहारची राजधानी पाटणा येथे शुक्रवारी 15 विरोधी पक्षांची बैठक झाली. मात्र या बैठकीत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची नाराजी ठळकपणे दिसून आली. अरविंद केजरीवाल यांनी केंद्राने दिल्ली सरकारविरुद्ध आणलेल्या अध्यादेशावर काँग्रेसचा पाठिंबा मागितला होता. मात्र काँग्रेसने अध्यादेशावर आपली भूमिका स्पष्ट केली नाही. त्यानंतर पत्रकार परिषदेपूर्वीच केजरीवाल दिल्लीला रवाना झाले.
'केजरीवाल नाराज नाहीत':बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव शनिवारी दिल्लीला रवाना झाले. यावेळी पत्रकारांनी तेजस्वी यांना केजरीवाल नाराज का झाले?, असे विचारले. तेव्हा तेजस्वी यांनी कोणतीही नाराजी नसल्याचे म्हटले. ते म्हणाले की, 'सर्व चर्चा झाल्या आहेत. इथे कोणीही स्वत:च्या स्वार्थासाठी आले नाही. जनतेच्या मागणीवरून आम्ही एकत्र आलो आहोत.'
'जनतेला मोदींबद्दल बोलायचे नाही':तेजस्वी पुढे म्हणाले की, 'जनतेला नरेंद्र मोदींबद्दल बोलायचे नाही. 2024 मध्ये होणारी लोकसभा निवडणूक ही जनतेची निवडणूक असेल. कोणत्याही विशिष्ट व्यक्तीची निवडणूक नाही. देशवासीयांच्या मुद्द्यावर निवडणूक होणार आहे. देशातील 125 कोटी जनतेसाठी निवडणुका होणार असून त्यांच्या मुद्द्यावरच निवडणुका लढवल्या जातील.' तेजस्व म्हणाले की, शुक्रवारच्या बैठकीत सर्वजण उपस्थित होते. सर्वांनी संघटित होऊन फॅसिस्ट शक्तींविरुद्ध एकजुटीने उभे राहण्याचा निर्धार केला.