भोपाळ - मध्य प्रदेशच्या दमोह जिल्ह्यातील पथरिया येथील आमदार रामबाई सिंह यांनी दहावीची परीक्षा दिली होती. दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर विज्ञान विषयात एक गुण कमी मिळाल्यामुळे त्या नापास झाल्या होत्या. मात्र, राज्यातील मुक्त शिक्षण मंडळाकडून 1 ग्रेस गुण मिळाल्यामुळे त्या उर्तीण झाल्या आहेत. बहुजन समाज पार्टी (बसपा) कडून निवडणूक लढलेल्या रामबाई सिंह यांनी फक्त आठवीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. राज्यातील मुक्त शिक्षण मंडळातून त्यांनी दहावीची परीक्षा दिली होती.
आमदार परिहार यांना विज्ञान विषयात 24 गुण मिळाले आहेत. तर उर्तीण होण्यासाठी नियमानुसार 25 गुण आवश्यक आहेत. त्यामुळे त्यांना राज्यातील मुक्त शिक्षण मंडळाकडून एक ग्रेस गुण देण्यात आला. त्यामुळे त्या परिक्षा उतीर्ण झाल्या आहेत. रामबाई यांनी परिक्षेचा निकाल आल्यानंतर आनंद व्यक्त केला. त्यांनी परिक्षा पास झाल्याचे श्रेय मुलीला दिले आहे.
राज्यातील मुक्त शिक्षण मंडळामध्ये असा नियम आहे, की एखाद्या उमेदवाराने पाच विषयांचे पेपर दिले असतील आणि तो सर्व परिक्षेत उत्तीर्ण झाला असेल. मात्र, फक्त एका विषयात 1 गुण कमी असेल. तर तो 1 गुण मंडळाच्या वतीने दिला जातो. यासाठी उमेदवाराला मंडळाकडे अर्ज सादर करावा लागतो, जेपीबी शाळेचे मुख्याध्यापक राजकुमार खरे यांनी सांगितले.