मुझफ्फरपूर : स्वातंत्र्य लढ्यात वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी फासावर जाणारे खुदीराम बोस हे देशातील महान स्वातंत्र्य सैनिकांमध्ये अग्रस्थानी आहेत. त्यांच्या धाडसाने इंग्रजांनाही धडकी भरली होती. 1908 मध्ये मुझफ्फरपूरमधून त्यांनी स्वातंत्र्याचे रणशिंग फुंकले होते. इंग्रज राजवटीला हादरे देणाऱ्या खुदीराम बोस यांची शौर्यगाथा जाणून घेऊया, या खास रिपोर्टमधून..
मुझफ्फरपूर ही बोस यांची कर्मभूमी
खुदीराम बोस यांचा जन्म 3 डिसेंबर 1889 रोजी पश्चिम बंगालच्या मिदनापूर इथे झाला होता. मात्र मुझफ्फरपूर ही त्यांची कर्मभूमी होती. 1905 मध्ये पश्चिम बंगालच्या फाळणीविरोधात खुदीराम बोस यांनी स्वातंत्र्य लढ्यात उडी घेतली. 28 फेब्रुवारी 1906 रोजी त्यांना पहिल्यांदा अटक झाली होती. मात्र इंग्रजांच्या हातावर तुरी देत ते यशस्वीपणे फरार झाले होते. बोस यांनी क्रांतीकारकांमध्ये एक नवी ऊर्जा भरण्याचे काम केले होते. खुदीराम बोस हे अतिशय निडर होते. जेव्हा त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली, तेव्हाही ते हसायला लागले होते. हे पाहून त्यांना शिक्षा ठोठावणारे न्यायाधीशही बुचकळ्यात पडले होते. यावेळी त्यांनी बोस यांना तुम्हाला काय शिक्षा ठोठावली आहे ते कळले आहे का असा प्रश्न विचारला होता. यावेळी बोस म्हणाले होते की, मला निर्णय पूर्ण समजला आहे, एवढेच नाही, तर वेळ मिळाला तर तुम्हालाही मी बॉम्ब बनविणे शिकवून देईन. अशा थोर विभूतींमुळेच आज आपण देशात स्वातंत्र्याचा आनंद घेत आहोत.
बोस यांनी इंग्रज राजवटीला दिले हादरे
मुझफ्फरपूरमधून खुदीराम बोस यांनी इंग्रज राजवटीला हादरे दिले. त्यांची कर्मभूमी असलेल्या मुझफ्फरपूरमध्ये आजही त्यांच्या आठवणी संग्रहित आहेत. मात्र यापैकी काही ठेवा हा सरकारी अनास्थेमुळे नष्टही होत आहे. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. संजय पंकज यांच्या मते मुझफ्फरपूरला बोस यांचा इतका निकटचा सहवास मिळूनही इथे त्यांच्याविषयीच्या माहितीचा अभाव आहे. ऐतिहासिक ठिकाणांमधून आपल्याला इतिहास माहिती होतो. अशा ठिकाणी गेल्यावर आपल्यात एक ऊर्जा संचारते. त्यामुळेच अशा क्रांतीकारकाने वास्तव्य केलेले हे ठिकाण सर्वसामान्यांसाठी खुले केले पाहिजे असे संजय पंकज यांनी म्हटले आहे.