मुंबई Passengers Eat Food On Tarmac : गोव्यावरुन दिल्लीला जाणारं विमान मुंबईत वळवण्यात आलं होतं. विमान मुंबईत वळवण्यात आल्यानंतर या विमानातील प्रवाशांना विमाने उभी करतात तिथेच खाली बसवण्यात आलं होतं. खाली बसूनचं या प्रवाशांनी जेवण केलं होतं. विमानतळावर प्रवासी खाली बसून जेवल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रचंड व्हायरल झाला होता. त्यानंतर आता विमान कंपनीनं प्रवाशांना खाली बसवल्याबद्दल माफी मागितली आहे. भविष्यात अशी घटना टाळण्यासाठी आवश्यक ती पावलं उचलण्यात येतील, असं आश्वासन विमान कंपनीनं प्रवाशांना दिलं आहे.
गोवा ते दिल्ली विमान वळवलं मुंबईत :इंडिगो कंपनीचं गोवा ते दिल्ली हे विमान तांत्रिक कारणामुळं मुंबईत वळवण्यात आलं होतं. इंडिगो कंपनीचं फ्लईट क्रमांक 6 ई 2195 हे विमान 14 जानेवारीला मुंबईत वळवण्यात आलं होतं. दिल्लीत असलेल्या कमी दृश्यमानतेमुळं हे विमान मुंबई विमानतळावर उतरवण्यात आल्याचं कंपनीच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं होतं. याप्रकरणी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळानंही एक निवेदन जारी केलं. प्रवाशांना पुढील कारवाई होईपर्यंत विमानतळ अधिकाऱ्यांच्या निगराणीखाली ठेवण्यात आलं.
विमान कंपनीनं मागितली माफी :प्रवाशांचा जमिनीवर बसून जेवण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर इंडिगो कंपनीनं माफी मागितली आहे. याबाबत इंडिगो कंपनीनं दिलेल्या निवेदनात "14 जानेवारी 2024 रोजी गोव्यावरुन दिल्ली जाणाऱ्या इंडिगो फ्लाइट क्रमांक 6 ई 2195 मुंबईला वळवण्यात आलं होतं. यावेळी प्रवाशांनी खाली बसून जेवण केल्याची घटना आम्हाला माहिती आहे. दिल्लीतील कमी दृश्यमानतेमुळं विमान मुंबईकडं वळवण्यात आलं. घडलेल्या घटनेबाबत आम्ही मनापासून दिलगीर आहोत. आमच्या ग्राहकांच्या बाबत भविष्यात अशी कोणतीही घटना टाळण्यासाठी आम्ही आवश्यक पावलं उचलू."
विमान कंपनीसह मुंबई विमानतळ प्राधिकरणाला नोटीस :मुंबई विमानतळावर घडलेल्या घटनेमुळं मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी इंडिगो कंपनीनं माफी मागितली आहे. मात्र त्यानंतर केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी सोमवारी रात्री उशिरा विमान प्राधिकरण अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या प्रकरणाची कसून तपासणी करण्याचे आदेश त्यांनी दिलेत. त्यामुळं डीजीसीएनं मुंबई विमानतळ प्राधिकरण आणि इंडिगो कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावल्याचं वृत्त वृत्तसंस्थेनं दिलं आहे.
हेही वाचा :
- ज्योतिरादित्य सिंधियांकडून पुणे विमानतळावरील नवीन टर्मिनलची पाहणी
- विमानाला उशिर झाल्यानं संतापला प्रवासी, थेट पायलटलाच केली मारहाण