नवी दिल्ली :मणिपूर हिंसाचारावरुन संसदेच्या पावसाळी अधिवेशनात चांगलाच गदारोळ सुरु असून विरोधक खासदार आज काळे कपडे घालून संसदेत पोहोचले. त्यामुळे आजही संसदेच्या पावसाळी अधिवेशनात मोठा गदारोळ झाला. दुसरीकडे शिवसेना(उद्धव ठाकरे गट) खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार निशाणा साधला. खासदार अरविंद सावंत यांनी तुम्ही भाजपचे पक्षाध्यक्ष नाही, तरी तुम्ही स्वतःला पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून घेत असल्याची टीका केली.
Live Update :
- लोकसभा, राज्यसभा दोन वाजेपर्यंत स्थगित :मणिपूर हिंसाचारावरुन लोकसभा आणि राज्यसभेत विरोधक खासदारांनी मोठा गदारोळ केला आहे. त्यामुळे लोकसभा आणि राज्यसभा दोन वाजेपर्यंत स्थगित करण्यात आली आहे.
काय म्हणाले संजय राऊत? :मणिपूर हिंसाचार हा देशाचा मुद्दा आहे, त्यामुळे पंतप्रधानांनी या मुद्द्यावर बोलावे. आम्ही आपल्या कोणत्याही मुद्द्याला विरोध करणार नाही, फक्त ऐकणार आहोत. मणिपूर जळत असून आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मणिपूर हिंसाचाराकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात' नाही, 'देश की बात' करावी, असे आवाहनही संजय राऊत यांनी केले.
अरविंद सावंत यांचाही हल्लाबोल :शिवसेना (उद्धव ठाकरे गट) नेता खासदार अरविंद सावंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला. विरोधकांनी केलेल्या नव्या आघाडीचा तीर बरोबर निशाण्यावर लागल्याचे यावेळी खोचक टीका अरविंद सावंत यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अतिआत्मविश्वास असल्याचाही आरोप त्यांनी केला. तुम्ही तुमच्या पक्षाचे अध्यक्ष नसतानाही स्वतःला पंतप्रधान पदाचे उमेदवार घोषित केले आहे. यावरुन तुमच्या पक्षात किती लोकशाही आहे, हे समजून आल्याची टीकाही त्यांनी केली.
काळे कपडे घालून विरोधक संसदेत :विरोधकांनी मणिपूर हिंसाचारावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत मणिपूर हिंसाचारावर निवेदन करण्याची मागणी विरोधकांनी केली होती. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत निवेदन न केल्यामुळे विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. विरोधकांनी आज संसदेत काळे कपडे घालून सरकारचा प्रतिकात्मक निषेध केला.
हेही वाचा -
- Parliament Monsoon Session 2023 : छत्तीसगडमधील 72 हजार नागरिकांची दिवाळी, सरकारने एसटी प्रवर्गात केला समावेश
- Manipur Violence : मणिपूर विषयावर चर्चेसाठी अखेर केंद्र सरकार तयार; अमित शाहांचे विरोधकांना पत्र