नवी दिल्ली Parliament Winter Session : आजपासून संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरु झालंय. यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माध्यमांशी संवाद साधला. चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबत महत्त्वपूर्ण भाष्य करताना त्यांनी देशानं नकारात्मकता नाकारल्याचं म्हटलंय.
पराभवाचा संसदेत राग काढू नका : विरोधकांच्या पराभवावरुन पंतप्रधान मोदी म्हणाले की, 'जे हरले आहेत त्यांनी संसदेत पराभवाचा राग काढू नये.' यासोबतच त्यांनी विरोधकांचं महत्त्वही अधोरेखित केलं. लोकशाहीत पक्ष आणि विरोधक हे दोन्ही तितकेच महत्त्वाचे आहेत, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. राजकीय विश्लेषकांनी हा निवडणूक निकाल सकारात्मक पद्धतीनं देशासमोर मांडावा, असं आवाहनही त्यांनी केलंय.
देशानं नकारात्मकतेला नाकारलं : तीन राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाच्या (भाजपा) विजयानंतर पंतप्रधान म्हणाले की, 'काही लोक याला प्रो-इन्कम्बन्सी, गुड गव्हर्नन्स किंवा पारदर्शकता म्हणतात, हे देशात दिसून येत आहे. देशानं नकारात्मकता नाकारली आहे. लोकांच्या आकांक्षा बळकट करण्यासाठी लोकशाहीचं मंदिर हे महत्त्वाचं व्यासपीठ आहे.' संसदेत मांडलेल्या विधेयकांवर तयार राहून सखोल चर्चा करावी, असे आवाहन पंतप्रधान मोदींनी केले.
विरोधकांना मोदींचा सल्ला : विरोधकांना सल्ला देताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे. विधानसभा निवडणुकीतील पराभवाचा राग बाहेर काढण्याचं नियोजन करण्याऐवजी त्यांनी मागील पराभवातून धडा घेऊन 9 वर्षांची नकारात्मकता सोडावी. या अधिवेशनात सकारात्मकतेनं पुढं वाटचाल केली तर त्यांच्याकडं पाहण्याचा देशाचा दृष्टिकोन बदलेल. विरोधकांवर निशाणा साधत पंतप्रधान मोदी म्हणाले की, त्यांनी निषेधाच्या बदल्यात निषेधाची पद्धत सोडली पाहिजे.
मी तुम्हाला सभागृहात सहकार्य करण्याची मनापासून विनंती करतो. याचा तुम्हालाही फायदा होईल. यातून देशाला सकारात्मकतेचा संदेश जाईल आणि तुमची प्रतिमा बदलेल-पंतप्रधान नरेंद्र मोदी
काय म्हणाले संसदीय मंत्री : हिवाळी अधिवेशन सुरु होण्यापूर्वी संसदीय मंत्री अर्जुन राम मेघवाल म्हणाले की, आज हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस आहे. विरोधकांना काही चर्चा करायची असेल तर ते तसा प्रस्ताव देऊ शकतात. लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभेचे अध्यक्ष ज्या काही मुद्द्यांवर निर्णय घेतील त्यावर चर्चा करण्यास सरकार तयार असल्याचं संसदीय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी यांगितलंय.
हेही वाचा :
- संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात; 'या' मुद्द्यांवरुन अधिवेशन वादळी होण्याची शक्यता
- Parliament Monsoon Session 2023 : ऑफशोर मिनरल्स (विकास आणि नियमन) दुरुस्ती विधेयक लोकसभेत मंजूर, सभागृह उद्यापर्यंत तहकूब