नवी दिल्ली Parliament Winter Session 2023 : संसदेच्या हिवाळी अधिवेशनात आतापर्यंत 141 खासदारांचं निलंबन करण्यात आलं आहे. त्यामुळं विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. विरोधकांनी संसदेच्या परिसरात जोरदार आंदोलन करत घोषणाबाजी केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आदींसह 'इंडिया' आघाडीतील अनेक खासदार या आंदोलनात सहभागी झाले.
सरकारला किंमत चुकवावी लागेल :सरकारनं संसदेच्या हिवाळी अधिवेशनात गदारोळ करणाऱ्या खासदारांवर निलंबनाची कारवाई केली आहे. या कारवाईच्या निषेधार्थ आज विरोधी खासदारांनी मोर्चा काढला. यावेळी बोलताना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सरकारवर जोरदार टीका केली. 50 वर्षांच्या काळात इतकी मोठी कारवाई कधीच करण्यात आली नव्हती. मात्र या सरकारनं ही कारवाई केली आहे. सरकारला याची किंमत चुकवावी लागेल, असा इशारा शरद पवार यांनी दिला आहे.
खासदार निलंबित केल्यानं विरोधकांचा मोर्चा :संसदेत खासदार निलंबित केल्यानं मोठा गदारोळ सुरू आहे. आज विरोधकांनी संसद भवन परिसरात मोर्चाचं आयोजन केलं आहे. या मोर्चात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेस पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सुप्रिया सुळे आदी खासदार सहभागी झाले होते. या खासदारांनी संसद भवन परिसरात मोर्चा काढला. यावेळी खासदारांनी सरकारविरोधात मोठी घोषणाबाजी केली. येत्या काळात या आंदोलनाची धार वाढवण्याची व्यूहरचना 'इंडिया' आघाडीचे नेता करत आहेत.
मिमिक्री दुर्दैवी, मात्र सुरुवात भाजपा नेत्यांनीच केली :संसदेच्या हिवाळी अधिवेशनात उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची मिमिक्री केल्यानं मोठा गदारोळ उडाला आहे. याप्रकरणी झारखंड मुक्ती मोर्चाच्या खासदार महुआ माजी यांनी "उपराष्ट्रपतींची मिमिक्री करणं दुर्दैवी आहे. असं घडायला नको होतं. कोणाची मिमिक्री करणं हे चुकीचं उदाहरण आहे. मात्र मिमिक्री करण्याची सुरुवात भाजपा नेत्यांनीच सुरु केली आहे. भाजपा नेत्यांनी काँग्रेसच्या अनेक नेत्यांची मिमिक्री केली आहे. त्यामुळं हे घडलं असावं. मात्र तरीही मी या घटनेचा निषेध करते. संसदेत खेळीमेळीचं वातावरण असावं, गृहमंत्र्यांनी 10 मिनिटं बोलावं, अशी मागणी केली होती."
हेही वाचा :
- 'मॉब लिंचिंगसाठी फाशीची शिक्षा, देशाविरुद्ध बोलल्यास जेलची हवा', लोकसभेत फौजदारी कायदा सुधारणा विधेयकं मंजूर
- उपराष्ट्रपतींची नक्कल करणं पडलं महागात, खासदार कल्याण बॅनर्जींविरोधात दोन तक्रारी दाखल
- खासदार निलंबन प्रकरण : विरोधकांचं संसदेसमोर आंदोलन, लोकशाही वाचवण्यासाठी दिल्या घोषणा