नवी दिल्ली Parliament Winter Session 2023 :संसदेच्या हिवाळी अधिवेशनात आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे या महाराष्ट्रातील खासदारांचं निलंबन करण्यात आलं. त्यांच्यासह शशी थरुर, कार्ती चिदंबरम, डिंपल यादव याचंही निलंबन करण्यात आल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. आतापर्यंत १४१ खासदारांच निलंबन करण्यात आलं आहे. कदाचित संसदेच्या इतिहासात एकाच अधिवेशन काळात एवढ्या खासदारांचं निलंबन केल्याची ही पहिलीच घटना असण्याची शक्यता आहे.
सुप्रिया सुळे, अमोल कोल्हेचं निलंबन :संसदेच्या हिवाळी अधिवेशनात आज लोकसभा सभापतींनी महाराष्ट्रातील दोन खासदारांचं निलंबन केलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांचं लोकसभा सभापतींनी निलंबन केलं. त्यांच्यासह लोकसभेतील अनेक खासदारांवर निलंबनाची कुऱ्हाड कोसळली. आज लोकसभा सभापतींनी राजदच्या खासदार डिंपल यादव, फारुख अब्दुल्ला, शशी थरुर, कार्ति चिदंबरम, मनीष तिवारी आदी 49 खासदारांचं आज निलंबन करण्यात आलं.
एनसीपीनं ट्विट करुन नोंदवला निषेध : शरद पवार राष्ट्रवादी गटाच्या ट्विटर हॅण्डल वरून निषेधाची पोस्ट करण्यात आली आहे. सरकार लोकशाही विरोधात असून दडपशाहीच्या माध्यमातून खासदार निलंबित केले आहेत. केवळ खासदार निलंबित केले नसून थेट लोकशाहीला संसदेतून निलंबित केल्याचं पोस्टमध्ये म्हटलं आहे. सलग ७ वेळा संसदारत्न व २ वेळा संसद महारत्न पुरस्कार मिळवणाऱ्या तसेच संसदेची प्रतिमा कायम जपणाऱ्या एक जबाबदार लोकप्रतिनिधी खा. सुप्रिया सुळे यांच्यासह खा. डाॅ. अमोल कोल्हे, खा. मोहम्मद फैजल यांचं दिल्लीत हिवाळी अधिवेशनात निलंबन होणं ही अत्यंत निषेधार्ह बाब आहे. ज्या भाजप खासदाराच्याच एका चुकीमुळे घुसखोरी होऊन संसदेची सुरक्षितता धोक्यात आली होती. त्यावर अधिवेशनात चर्चा करण्याची माफक मागणी होती. परंतु दडपशाहीने ही मागणी नाकारत याउलट विरोधी पक्षातील खासदारांवरच कारवाई होत १४१ खासदारांचे निलंबन करण्यात आलं आहे.