नवी दिल्ली Amit Shah : गृहमंत्री अमित शाह यांनी गुरुवारी लोकसभेत जम्मू-काश्मीरशी संबंधित दोन नवीन विधेयकांवर चर्चा केली. यावेळी बोलताना त्यांनी काँग्रेस पक्षावर जोरदार निशाणा साधला. जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यानं काही लोक नाराज झाले असल्याचं अमित शाह म्हणाले. जम्मू-काश्मीर आरक्षण (दुरुस्ती) विधेयक लोकसभेत मंजूर झालं आहे.
काय म्हणाले अमित शाह : जम्मू-काश्मीर आरक्षण दुरुस्ती कायदा २०२३ आणि जम्मू-काश्मीर फेररचना दुरुस्ती विधेयक २०२३ ही ७० वर्षांपासून दुर्लक्ष झालेल्यांना न्याय देण्यासाठीची विधेयकं असल्याचं शाह यांनी सांगितलं. कलम ३७० सुमारे ४५ हजार लोकांच्या मृत्यूला कारणीभूत होतं. म्हणून मोदी सरकारनं ते कलम उखडून टाकल्याचा घणाघात शाहांनी केला. पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंमुळे पाकव्याप्त काश्मीरची समस्या सर्वप्रथम उद्भवली. संपूर्ण काश्मीर आपल्या हातात न येता युद्धबंदी लागू केली गेली, अन्यथा तो भाग काश्मीरचाच राहिला असता, असा दावा त्यांनी केला आहे. शाह यांच्या या विधानानंतर सभागृहात गदारोळ झाला. त्यानंतर विरोधकांनी लोकसभेतून वॉकआउट केलं.
एक चिन्ह आणि एक ध्वज असायला हवा : यावेळी बोलताना अमित शाहंनी, ३७० कलम हटवल्यानंतर दगडफेक करण्याचीही कोणाची हिंमत झाली नसल्याचा दावा केला. कलम ३७० आधीच हटवायला हवं होतं. तसंच देशाचं एकच चिन्ह आणि एकच ध्वज असायला हवा असंही शाह म्हणाले. जम्मू-कश्मीरमध्ये सध्या ३ वर्षांसाठी शून्य दहशतवादाची भूमिका केंद्राची आहे. ही भूमिका २०२६ पर्यंत पूर्णपणे लागू केली जाईल असं अमित शाह यांनी सांगितलं.